गोंदियात दुष्काळाचा भीषण चटका, शेतकरी हवालदिल!
पालकमंत्री इंद्रनील नाईक अखेर बांधावर; तात्काळ आर्थिक भरपाई द्या
गोंदिया (विशेष प्रतिनिधी) : पावसाच्या प्रदीर्घ खंडामुळे संपूर्ण गोंदिया जिल्ह्यात दुष्काळाचे भीषण सावट पसरले असून, खरीप हंगामातील पिके डोळ्यांसमोर करपून गेल्याने बळीराजा पूर्णपणे उद्ध्वस्त झाला आहे. ट्रिगर-१ मध्ये तिरोडा तालुका आणि त्यानंतर ट्रिगर-२ मध्ये जिल्ह्यातील उर्वरित सर्वच तालुक्यांचा दुष्काळात समावेश झाल्याने परिस्थिती अत्यंत स्फोटक बनली आहे. या पार्श्वभूमीवर पालकमंत्री इंद्रनील नाईक यांनी आज तिरोडा व गोंदिया तालुक्यातील शेतशिवारात जाऊन नुकसानग्रस्त पिकांची प्रत्यक्ष पाहणी केली. मात्र, केवळ पाहणी दौऱ्यांचे शासकीय सोपस्कार नकोत, तर तात्काळ ओला/सुका दुष्काळ जाहीर करून खात्यात रोख भरपाई जमा करा, असा आक्रमक पवित्रा संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांनी घेतला आहे.
पालकमंत्र्यांनी तिरोडा तालुक्यातील सर्वाधिक होरपळलेल्या पांजरा येथे शेतकरी बळीराम चामट, विहीरगाव येथे शेतकरी अशोक रहांगडाले आणि गोंदिया तालुक्यातील डोंगरगाव येथे शेतकरी घनश्याम पटले यांच्या शेतातील करपलेल्या पिकांची पाहणी केली. पावसाअभावी पिकांची खुंटलेली वाढ, पाण्याचे कोरडे पडलेले स्त्रोत आणि वाढत्या उत्पादन खर्चामुळे कर्जबाजारी झालेल्या शेतकऱ्यांनी आपल्या व्यथा थेट पालकमंत्र्यांसमोर मांडल्या. सिंचनाची कोणतीही सोय नसताना डोळ्यांसमोर उभं पीक मातीमोल होत असल्याचे सांगताना शेतकऱ्यांचे डोळे पाणावले होते.
शासकीय मदतीच्या गप्पा मारणाऱ्या प्रशासनाने अजूनही प्रत्यक्ष वस्तुनिष्ठ पंचनामे युद्धपातळीवर सुरू केलेले नाहीत, असा थेट आरोप शेतकऱ्यांनी केला. ट्रिगर-२ च्या निकषात सर्व तालुके अडकवून ठेवण्यापेक्षा प्रत्यक्ष बांधावरचे वास्तव पाहून तातडीने सरसकट नुकसानभरपाई आणि विम्याची रक्कम मंजूर करावी, अशी जोरदार मागणी शेतकऱ्यांनी लावून धरली. या पाहणी दौऱ्यादरम्यान आमदार विजय रहांगडाले, आमदार विनोद अग्रवाल, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी निलेश कानवडे, तहसीलदार नारायण ठाकरे, तहसीलदार समशेर पठाण, बीडीओ संघमित्रा कोल्हे, डोंगरगावच्या सरपंच कोमेश्वरी टेंभरे व तालुका कृषी अधिकारी उपस्थित होते. दुष्काळाने कंबरडे मोडलेल्या शेतकऱ्यांच्या जखमेवर केवळ आश्वासनांची मलमपट्टी न करता शासनाने तातडीने विशेष आर्थिक पॅकेज जाहीर करावे; अन्यथा हवालदिल झालेला बळीराजा रस्त्यावर उतरून तीव्र संघर्ष छेडेल, असा स्पष्ट इशारा आता ग्रामीण भागातून दिला जात आहे.

