बाधित शेतकऱ्यांना मदत आणि दिवाळीपूर्वी धान खरेदी सुरू करा
खासदार राजेंद्र जैन यांचे जिल्हा प्रशासनाला निर्देश
गोंदिया : गोंदिया जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त शेतकरी आणि नागरिकांना शासनाच्या विविध योजनांचा व सवलतींचा लाभ तातडीने मिळवून देण्याच्या दिशेने जिल्हा प्रशासनाने पावले उचलली आहेत. जिल्ह्यातील शेतकरी वर्गाच्या हितासाठी आणि त्यांना आर्थिक संकटातून बाहेर काढण्यासाठी दिवाळीपूर्वी शासकीय धान खरेदी तातडीने सुरू करण्यात यावी, अशा महत्त्वपूर्ण सूचना खासदार राजेंद्र जैन यांनी जिल्हा प्रशासनाला दिल्या आहेत.
जिल्ह्याचे पालकमंत्री इंद्रनील नाईक यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालय, गोंदिया येथे दुष्काळ निवारण व जलसंधारण या विषयांसह शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांवर जिल्हा प्रशासनाची बैठक पार पडली. या बैठकीत खा. राजेंद्र जैन यांनी शासन निर्णयानुसार बाधित शेतकरी व नागरिकांना जमीन महसुलातून सूट, पीककर्जाचे पुनर्गठन, कर्जवसुलीस स्थगिती, कृषिपंपांच्या वीजबिलात सवलत, विद्यार्थ्यांच्या परीक्षा शुल्कात माफी, शेतकरी व शेतमजुरांसाठी अन्नधान्याची व्यवस्था, जनावरांसाठी चारा उपलब्ध करून देणे तसेच जलसंधारणाची कामे आदी उपाययोजनांचा लाभ मिळणे आवश्यक असल्याचे सांगितले. बोदलकसा सिंचन प्रकल्पाच्या पाळ फुटीमुळे झालेले नुकसान व भविष्यातील उपायांवर प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी प्रशासनाने तातडीने कार्यवाही करावी, असे निर्देशही त्यांनी दिले.
नुकसानभरपाई आणि धान खरेदी प्रक्रिया गतिमान करण्याचे निर्देश:
नैसर्गिक आपत्तीमुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांच्या पीक नुकसानीचे पंचनामे तातडीने पूर्ण करण्यात यावेत. प्रत्यक्ष क्षेत्रीय सर्वेक्षण करून पिकांचे छायाचित्रण आणि जीपीएस निर्देशांकांची नोंद घ्यावी, जेणेकरून वस्तुनिष्ठ अहवाल तयार होऊन पात्र शेतकऱ्यांना नुकसानभरपाई मिळण्याची प्रक्रिया गतिमान होईल. तसेच खरीप हंगामातील धान उत्पादक शेतकऱ्यांना त्यांच्या उत्पादनाची विक्री वेळेत करता यावी आणि दिवाळी सणासाठी आवश्यक आर्थिक तरतूद व्हावी, यासाठी शासकीय धान खरेदी केंद्रे दिवाळीपूर्वी सुरू करणे अत्यंत गरजेचे आहे. त्यामुळे खरेदी केंद्रांची तयारी, बारदाना उपलब्धता आणि नोंदणी प्रक्रिया पूर्ण करून दिवाळीपूर्वी धान खरेदी सुरू करावी, असे निर्देश खा. राजेंद्र जैन यांनी संबंधित विभागांना दिले. शेतकऱ्यांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागू नये आणि सणासुदीच्या काळात त्यांना व त्यांच्या कुटुंबीयांना योग्य दिलासा मिळावा, यासाठी प्रशासकीय यंत्रणांनी परस्पर समन्वयाने काम करून सर्व प्रक्रिया प्राधान्याने पूर्ण करावी, अशी ठाम भूमिका त्यांनी यावेळी मांडली. या बैठकीला आ. विनोद अग्रवाल, आ. विजय रहांगडाले, आ. राजकुमार बडोले यासह यंत्रणेचे अधिकारी उपस्थित होते.

