LatestNewsगोंदिया- भंडाराविदर्भ

खराशी येथे महाप्रसाद खाल्ल्यानंतर विषबाधा; १६९ हून अधिक नागरिकांची प्रकृती बिघडली, रुग्णालयात उपचार सुरू

लाखनी : लाखनी तालुक्यातील खराशी गावात नवरात्रोत्सवाच्या महाप्रसादानंतर विषबाधेची (फूड पॉयझनिंग) गंभीर घटना घडल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. गायत्री माता मंदिरात महाप्रसादाचे सेवन केल्यानंतर १६९ हून अधिक ग्रामस्थांना उलट्या, जुलाब, मळमळ आणि पोटदुखीचा त्रास सुरू झाला. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन आरोग्य विभागाने गावात तातडीने आपत्कालीन वैद्यकीय शिबीर सुरू केले आहे. गंभीर रुग्णांमध्ये तीन गरोदर महिलांचाही समावेश असून, त्यांना पुढील उपचारासाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय, भंडारा येथे दाखल करण्यात आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवारी गायत्री माता मंदिरात सुमारे ७०० ते ८०० ग्रामस्थांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. दुपारी १२ ते ३ दरम्यान तयार केलेल्या भोजनात भात, पोळी, वरण, बटाटा-वांग्याची भाजी, जिलेबी, कढी आणि हरभऱ्याची कोशिंबीर वाढण्यात आली होती. सायंकाळी ५ ते रात्री ९ या वेळेत महाप्रसादाचे वितरण झाले. त्यानंतर रात्री उशिरा १ वाजता काही जणांना उलट्या-जुलाबाचा त्रास झाला, तर बुधवारी सकाळी ७ ते ८ च्या दरम्यान अनेक ग्रामस्थांची प्रकृती बिघडल्याने गावात भीतीचे वातावरण निर्माण झाले.
रुग्णालयात उपचार आणि आरोग्य पथकांचे सर्वेक्षण:
घटनेची माहिती मिळताच पालांदूर ग्रामीण रुग्णालय आणि मुरमाडी प्राथमिक आरोग्य केंद्राची पथके खराशी गावात पोहोचली. ग्रामपंचायत भवनात आपत्कालीन वैद्यकीय शिबीर लावून रुग्णांवर उपचार सुरू करण्यात आले. बुधवारी दुपारी १ वाजेपर्यंत १६९ हून अधिक रुग्णांवर उपचार करण्यात आले असून, त्यापैकी २१ रुग्णांना सलाईन लावून उपचार दिले गेले, तर नऊ गंभीर रुग्णांना पालांदूर ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे एकूण ५२ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. याशिवाय २३ रुग्णांना पुढील उपचारासाठी इतर रुग्णालयांत हलवण्यात आले आहे. आरोग्य विभागाची पाच विशेष पथके गावातील ३२० घरांचे सर्वेक्षण करत आहेत.
अन्न व पाण्याचे नमुने तपासणीसाठी पाठवले:
प्रशासनाने महाप्रसादाचे सात नमुने, पाण्याचे तीन नमुने आणि पाच रुग्णांचे शौच नमुने गोळा केले आहेत. अन्नाचे नमुने प्रादेशिक आरोग्य प्रयोगशाळा, नागपूर आणि पाणी व शौच नमुने जिल्हा प्रयोगशाळा, भंडारा येथे तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत. तपासणी अहवाल आल्यानंतरच विषबाधेचे वास्तविक कारण स्पष्ट होईल. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. नितीन कापसे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संदीपकुमार गजभिये, जिल्हा साथीचे रोग अधिकारी डॉ. श्रीकांत आंबेकर आणि विस्तार अधिकारी अनिल बनकर परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत. आमदार नाना पटोले आणि अविनाश ब्राह्मणकर यांनी गावात तसेच पालांदूर रुग्णालयात जाऊन रुग्णांची विचारपूस केली. जिल्हाधिकारी सावन कुमार यांनी भंडारा जिल्हा रुग्णालयात पोहोचून रुग्णांची भेट घेतली आणि डॉक्टरांना उपचारात हलगर्जीपणा न करण्याचे निर्देश दिले. खराशीच्या सरपंच योगिता झालके आणि ग्रामपंचायत पदाधिकारी मदतकार्यात सक्रिय सहकार्य करत आहेत.

Spread the News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *