LatestNewsगोंदिया- भंडारा

कोहलगाव टी-पॉइंटवरील रास्तारोको आंदोलनाला अखेर यश!

अग्रवाल ग्लोबल इन्फ्रा’ झुकली; ३० ऑगस्टपर्यंत रस्ता डागडुजीचे लेखी आश्वासन
नवेगाव बांध (गोंदिया) :
कोहलगाव टी-पॉइंट येथे रस्त्याचे काम रखडल्यामुळे विद्यार्थी, नागरिक आणि वाहनचालकांना सहन कराव्या लागणाऱ्या हालअपेष्टांच्या निषेधार्थ बुधवार, १९ ऑगस्ट रोजी छेडण्यात आलेल्या तीव्र रास्तारोको आंदोलनाला अखेर यश आले आहे. आंदोलकांचा वाढता आक्रोश आणि आक्रमक पवित्रा लक्षात घेऊन अग्रवाल ग्लोबल इन्फ्रा प्रा. लि., रायपूरचे प्रतिनिधी अमोल भुरे यांनी वरिष्ठ अधिकारी व आंदोलनकर्त्यांच्या समक्ष लेखी आश्वासन दिल्यानंतर हे आंदोलन तात्पुरते मागे घेण्यात आले.

श्याम ठवरे युवा फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष डॉ. राहुल ठवरे यांच्या धडाकेबाज नेतृत्वाखाली सकाळी ११ वाजता या आंदोलनाला सुरुवात झाली. रस्त्याच्या दुरवस्थेमुळे कोहलगाव, कान्होली, धाबेटेकडी, पवनी, जांभळी, येलोडी, तिडका व जब्बारखेडा परिसरातील ग्रामस्थांचे जगणे असह्य झाल्याचा घणाघाती आरोप आंदोलनकर्त्यांनी केला. या आंदोलनाची गंभीर दखल घेत कंपनीचे प्रतिनिधी, आर व्ही असोसिएट्सचे विकास नारायण, MSIDC नागपूरचे टेक्निकल ॲडव्हायझर संतोष जाधव आणि MSIDC चे उपअभियंता शुभम उगिले यांनी आंदोलनस्थळी धाव घेऊन चर्चा केली.
कंपनीने दिलेल्या लेखी आश्वासनानुसार, नवेगावबांध येथील टुटीया गेट ते ६०+६०० आणि कोहलगाव ते गोठणगाव या मार्गातील कामाचे सर्व अडथळे दूर करून रस्त्याची डागडुजी व वाहतुकीस योग्य व्यवस्था ३० ऑगस्ट २०२६ पर्यंत पूर्ण केली जाईल. तसेच, उर्वरित काँक्रीट रस्त्याचे काम निर्धारित वेळेत पूर्ण करण्याची हमी कंपनीने दिली आहे. विशेष म्हणजे, रस्ता खराब असल्यामुळे अपघात झाल्यास संपूर्ण वैद्यकीय खर्चाची जबाबदारी कंपनी घेणार असून, आपत्कालीन मदतीसाठी तात्काळ रुग्णवाहिका व वाहन उपलब्ध करून देण्याचे मान्य केले आहे.
आंदोलनादरम्यान कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून नवेगावबांध पोलीस ठाण्याचे ठाणेदार अजित पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली कडक पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. या आंदोलनात पंचायत समिती सदस्या श्रीमती चंद्रकला ठवरे, सचिन कापगते, सतीश कापगते, योगेश कापगते, कोहलगावचे सरपंच बळीराम टेंभुर्णी, तमका अध्यक्ष हरिभाऊ नैताम, गुरुदेव चांदेवार, रचनाताई डोंगरवार, रामेश्वर घुगुसकर, उपसरपंच रवींद्र नाईक, कुमार दोनोडे, विलास थेर, पतिराम टेकाम, कैलास लाडे, गजानन मुनेश्वर, रामू धुर्वे, राजू खंडाईत यांच्यासह शेकडो ग्रामस्थ रस्त्यावर उतरले होते.
“कंपनीने लेखी आश्वासन दिल्याने आंदोलन तात्पुरते स्थगित करण्यात आले आहे. परंतु, ३० ऑगस्टपर्यंत दिलेल्या वचनांची अंमलबजावणी झाली नाही, तर यापेक्षाही तीव्र आणि आक्रमक आंदोलन छेडले जाईल,” असा इशारा डॉ. राहुल ठवरे व आंदोलनकर्त्यांनी प्रशासनाला दिला आहे.

Spread the News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *