LatestNewsगोंदिया- भंडाराविदर्भ

रानडुकराची थेट घरात घुसून दहशत! वडेगावात ६५ वर्षीय वृद्धेवर जीवघेणा हल्ला

वन विभागाच्या ढिम्म कारभाराविरोधात संतापाचा भडका!
तिरोडा (विशेष प्रतिनिधी
): शेतशिवारात धुमाकूळ घालणाऱ्या रानटी श्वापदांनी आता थेट मानवी वस्त्यांमध्ये उच्छाद मांडला असून, तिरोडा तालुक्यातील वडेगाव येथे अत्यंत थरकाप उडवणारी घटना घडली आहे. २१ ऑक्टोबर रोजी रात्री ८ वाजेच्या सुमारास एका पिसाळलेल्या रानडुकराने चक्क घरात घुसून ६५ वर्षीय छायाताई हेमराज बडगे या वृद्धेवर भीषण व जीवघेणा हल्ला चढवला. या रक्तरंजित हल्ल्यात त्या गंभीर जखमी झाल्या असून, सध्या त्यांच्यावर तिरोडा उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. घरातही सुरक्षित राहिलेले नाही, हे स्पष्ट झाल्याने संपूर्ण परिसरात प्रचंड दहशतीचे सावट पसरले असून वन विभागाच्या नाकर्तेपणाविरुद्ध ग्रामस्थांचा संताप अनावर झाला आहे.
घटनेच्या वेळी छायाताई या घरात नेहमीप्रमाणे घरगुती कामात व्यस्त होत्या. त्याचवेळी दबा धरून बसलेल्या रानडुकराने अचानक घरात घुसखोरी करत त्यांच्यावर जोरदार हल्ला चढवला. अचानक झालेल्या या हल्ल्याने वृद्धेचा आक्रोश ऐकून परिसरातील नागरिक मदतीसाठी धावले, तोपर्यंत रानडुकराने त्यांना रक्तबंबाळ करून पळ काढला होता. गंभीर जखमी अवस्थेत त्यांना तातडीने तिरोडा उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले.
परिसरामध्ये मागील अनेक दिवसांपासून रानडुकरे आणि नीलगायींचा उपद्रव वाढला असून बळीराजाची पिके आधीच उद्ध्वस्त झाली आहेत. शेतातील पिके फस्त केल्यानंतर आता ही हिंस्र जनावरे थेट घरांच्या उंबरठ्यापर्यंत पोहोचून नागरिकांच्या जिवावर उठली आहेत. वारंवार तक्रारी करूनही वन विभागाचे अधिकारी मात्र हातावर हात धरून बसल्याचा थेट आरोप संतप्त ग्रामस्थ करत आहेत.
वन विभाग आणखी एखाद्या निष्पाप जिवाच्या बलिदानाची वाट पाहत आहे का? वन अधिकाऱ्यांनी तात्काळ वडेगाव परिसरात रात्रंदिवस गस्त पथके तैनात करून गावात घुसणाऱ्या मोकाट रानडुकरांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करावा, तसेच गंभीर जखमी वृद्धेला तातडीने आर्थिक मदत द्यावी; अन्यथा वन परिक्षेत्र कार्यालयावर धडक मोर्चा काढून टाळे ठोकू, असा सज्जड इशारा संतप्त गावकऱ्यांनी दिला आहे.

Spread the News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *