‘उलटा चोर कोतवाल को डांटे!’ भ्रष्टाचाराची तक्रार करणारा आरटीओ निरीक्षकच ५०० रुपयांच्या लाचेसाठी ‘एसीबी’च्या जाळ्यात!
नागपूर : आरटीओ कार्यालयात भ्रष्टाचार सुरू असून, भ्रष्ट अधिकाऱ्यांची चौकशी करावी, अशी खोटी तक्रार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे (एसीबी) करणारा आरटीओचा मोटार वाहन निरीक्षक व त्याचा खासगी साथीदार स्वतःच लाच घेताना रंगेहाथ अडकल्याचा धक्कादायक प्रकार नागपुरात उघडकीस आला आहे. ‘एसीबी’ने ५०० रुपयांची लाच घेताना खुर्सापार सीमा तपासणी नाक्यावर ही कारवाई केली. साजन शालिग्राम शेंडे (वय ५०) असे लाच घेताना अटक करण्यात आलेल्या मोटार वाहन निरीक्षकाचे नाव असून, प्रवीण बाबुराव गायधने (वय ५०, रा. रघुजीनगर) असे त्याच्या खासगी साथीदाराचे नाव आहे. या कारवाईमुळे आरटीओ वर्तुळात प्रचंड खळबळ उडाली आहे.
शेंडे हा नागपूर ग्रामीण प्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालयात मोटार वाहन निरीक्षक म्हणून कार्यरत असून, खुर्सापारच्या महाराष्ट्र-मध्य प्रदेश सीमा तपासणी नाक्यावर त्याची ड्युटी होती. तक्रारदार हे ४२ वर्षीय ट्रक चालक-मालक आहेत. यापूर्वी खुर्सापार नाक्यावरून जाताना तक्रारदाराकडून शेंडे याने लाच घेतली होती. तक्रारदाराला पुन्हा त्याच नाक्यावरून जायचे असल्याने आणि पुन्हा लाचेची मागणी होण्याची शक्यता वाटल्याने, त्यांनी ‘एसीबी’कडे रीतसर तक्रार नोंदवली. धक्कादायक बाब म्हणजे, लाच घेताना अटक करण्यात आलेला मोटार वाहन निरीक्षक साजन शेंडे याने ३० मार्च रोजी २० मोटार वाहन निरीक्षकांच्या स्वाक्षरीचे निवेदन ‘एसीबी’ कार्यालयात सादर करून काही अधिकाऱ्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप केले होते. मात्र, शेंडे याच्या तक्रारीनंतर ‘एसीबी’ने केलेल्या अंतर्गत तपासणीत शेंडे हा स्वतःच सीमा तपासणी नाक्यावर उघडपणे लाच घेत असल्याचे समोर आले होते. त्यानंतर ‘एसीबी’च्या पथकाने ११ जून रोजी तक्रारदाराच्या तक्रारीवरून खुर्सापार नाक्यावर सापळा रचला. दरम्यान, तक्रारदार तपासणी नाक्यावरून जात असताना शेंडे याचा खासगी साथीदार प्रवीण गायधने याने शेंडे याच्या सांगण्यावरून ५०० रुपयांची लाच स्वीकारली. लाच स्वीकारताच दबा धरून बसलेल्या ‘एसीबी’च्या पथकाने दोघांनाही रंगेहाथ ताब्यात घेतले. नागपूर ‘एसीबी’च्या पथकाने गेल्या दोन दिवसांत केलेली ही दुसरी मोठी कारवाई आहे. यापूर्वी बुधवारी ‘एसीबी’ने महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचा अधिकारी सुभाष बबन भुजबळ याला कंत्राटदाराच्या परवान्याचे नूतनीकरण करण्यासाठी ३० हजार रुपयांची लाच घेताना रंगेहाथ अटक केली होती. त्यानंतर अवघ्या २४ तासांत ही दुसरी कारवाई झाल्याने भ्रष्ट अधिकाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.

