पदवीधरांचा फैसला उद्या मतपेटीत बंद होणार ! २२ हजारांवर सुशिक्षित मतदार ठरवणार भवितव्य
गोंदिया जिल्ह्यात ३९ केंद्रांवर कडक पोलीस बंदोबस्त!
गोंदिया (विशेष प्रतिनिधी): पदवीधरांच्या न्याय्य हक्कांसाठी आणि सुशिक्षितांचे प्रश्न सभागृहात मांडण्यासाठी होणाऱ्या पदवीधर मतदारसंघाच्या रणधुमाळीचा अंतिम टप्पा अखेर आला असून, उद्या गुरुवार, २३ ऑक्टोबर रोजी प्रत्यक्ष मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. गोंदिया जिल्ह्यातील तब्बल २२ हजार १७६ सुशिक्षित पदवीधर मतदार आपल्या मतदानाचा हक्क बजावून उमेदवारांचे भवितव्य ठरवणार आहेत. प्रशासनाने या निवडणुकीसाठी सर्व तयारी पूर्ण केली असून, सकाळी ८ ते दुपारी ४ या वेळेत मतदान पार पडणार आहे.
जिल्ह्यातील अंतिम मतदार आकडेवारीनुसार, एकूण मतदारांमध्ये १३ हजार ९६५ पुरुष, तर ८ हजार २११ महिला मतदारांचा समावेश आहे. संपूर्ण जिल्ह्यात शांततेत आणि निष्पक्ष वातावरणात प्रक्रिया पार पाडण्यासाठी प्रशासनाने ३९ मतदान केंद्रांची चोख आखणी केली आहे. या महासंग्रामासाठी १८० अधिकारी व कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली असून, संवेदनशील व सर्व केंद्रांवर कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. गैरप्रकार रोखण्यासाठी निवडणूक यंत्रणा हायअलर्टवर आहे.
आपल्या हक्कांचा लोकप्रतिनिधी निवडण्यासाठी सुशिक्षित वर्गाने केवळ सोशल मीडियावर चर्चा न करता प्रत्यक्ष मतदान केंद्रावर जाऊन कर्तव्य पार पाडणे अत्यंत आवश्यक आहे. मतदानासाठी येताना प्रत्येक पात्र मतदाराने आपले वैध ओळखपत्र सोबत ठेवणे अनिवार्य आहे. पदवीधरांच्या बेरोजगारी, पेन्शन आणि विविध प्रलंबित मागण्यांच्या पार्श्वभूमीवर होणाऱ्या या निवडणुकीत सुशिक्षित मतदार कोणाच्या पारड्यात आपले वजन टाकतात, याकडे आता संपूर्ण राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. लोकशाही बळकट करण्यासाठी सर्व पदवीधरांनी घरातून बाहेर पडून निर्भयपणे १०० टक्के मतदान करावे, असे आवाहन निवडणूक प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

