यवतमाळजवळ ट्रक-कारचा भीषण अपघात; मायलेकीचा मृत्यू, तिघे गंभीर
दारव्हा मार्गावरील जामवाडी तलावाजवळील घटना
ट्रकचालक वाहनासह फरार; जखमींना नागपूरला केले रेफर
यवतमाळ : दारव्हा मार्गावरील जामवाडी तलावाजवळ बुधवारी सकाळी ८ वाजेच्या सुमारास ट्रक आणि कारमध्ये झालेल्या भीषण अपघातात दोन जणांचा जागीच मृत्यू झाला, तर तिघे जण गंभीर जखमी झाले. मृतांमध्ये एका महिला आणि अवघ्या दोन वर्षांच्या चिमुरडीचा समावेश आहे. हे सर्वजण एकाच कुटुंबातील असून यवतमाळ जिल्ह्यातील अर्जुना गावचे रहिवासी आहेत.
माहितीनुसार, चव्हाण कुटुंब कारने (क्र. MH-29 CJ-2048) दारव्हाच्या दिशेने जात होते. कार जामवाडी तलावाजवळ पोहोचली असता, समोरून आलेल्या एका भरधाव अज्ञात ट्रकने कारला जोरदार धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की कारच्या पुढच्या आणि मागच्या भागाचा पुरता चक्काचूर झाला. कारमधील सर्वजण रक्ताच्या थारोळ्यात अडकून पडले होते. अपघाताची माहिती मिळताच लाडखेड पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी स्थानिक नागरिकांच्या मदतीने सर्व जखमींना रुग्णवाहिकेने यवतमाळच्या शासकीय रुग्णालयात दाखल केले. मात्र, तेथील डॉक्टरांनी तपासणीअंती रेणुका तुकाराम चव्हाण (५५) आणि दोन वर्षीय चिमुरडी तृप्ती सूरज चव्हाण यांना मृत घोषित केले.
………….
जखमींना नागपूरला हलवले
या अपघातात सूरज तुकाराम चव्हाण, मनीषा सूरज चव्हाण आणि कार चालक पवन नंदू चव्हाण हे तिघे गंभीर जखमी झाले आहेत. त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याने प्राथमिक उपचारानंतर त्यांना पुढील उपचारासाठी नागपूरला रेफर करण्यात आले आहे.
अपघात करून ट्रकचालक फरार प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, अपघातानंतर ट्रकचालक घटनास्थळावरून वाहनासह फरार झाला. लाडखेड पोलीस अज्ञात ट्रकचा शोध घेत असून पुढील तपास सुरू आहे. या अपघातामुळे दारव्हा मार्गावरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती.

