LatestNewsगुन्हेवार्तागोंदिया- भंडारा

कोहमारा परिसरात फिल्मी स्टाईल पाठलाग! परराज्यातील सराईत घरफोड्या पोलिसांच्या जाळ्यात

दुचाकीसह १ लाख २१ हजारांचा मुद्देमाल जप्त!
सडक अर्जुनी (गोंदिया):
दिवाळीच्या तोंडावर चोरी आणि घरफोड्यांचे सत्र सुरू करणाऱ्या गुन्हेगारांचे धाबे दणाणून सोडत डुग्गीपार पोलिसांनी मोठी कामगिरी बजावली आहे. कोहमारा परिसरात संशयास्पदरीत्या फिरणाऱ्या एका आंतरराज्यीय सराईत घरफोड्याला पोलिसांनी अत्यंत शिताफीने सापळा रचून बेड्या ठोकल्या. आरोपीच्या ताब्यातून चोरीची दुचाकी, सोन्या-चांदीचे दागिने, पितळी पूजेचे साहित्य आणि घरफोडीसाठी लागणारी हत्यारे असा एकूण १ लाख २१ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. या कारवाईमुळे केवळ गोंदियाच नव्हे, तर शेजारील भंडारा आणि चंद्रपूर जिल्ह्यातील अनेक मोठ्या घरफोड्यांची पाळेमुळे खणून निघण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
दिनांक २२ ऑक्टोबर रोजी कोहमारा परिसरात दोन संशयित तरुण दुचाकीवर संशयास्पद चकरा मारत असल्याची पक्की गोपनीय माहिती डुग्गीपार पोलीस ठाण्याचे कर्तव्यदक्ष पोलीस हवालदार दीपक खोटेले यांना मिळाली. त्यांनी क्षणाचाही विलंब न लावता ही माहिती तात्काळ पोलीस निरीक्षक कमलेश सोनटक्के यांच्या कानावर घातली. माहिती मिळताच पोलीस पथकाने कोहमारा परिसरात गुप्त सापळा रचला. संशयित इसम मोटारसायकलवरून येताना दिसताच पोलिसांनी त्यांना थांबण्याचा इशारा केला; मात्र पोलिसांना पाहताच दोघांनीही पळ काढण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी क्षणाचाही विचार न करता फिल्मी स्टाईल पाठलाग करत एका आरोपीला जागीच झडप घालून पकडले, तर त्याचा दुसरा साथीदार अंधाराचा फायदा घेऊन पसार होण्यात यशस्वी ठरला.
ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपीची पंचांसमक्ष कसून अंगझडती घेतली असता, त्याच्याकडील कापडी पिशवीत चोरीचा माल भरलेला पाहून पोलीसही चक्रावून गेले. आरोपीकडून सोन्याचे दागिने, चांदीच्या अंगठ्या, तोरड्या, चांदीचे छल्ले, पूजेचा करंडा आणि पितळी समया असा सुमारे ६१ हजार रुपयांचा मुद्देमाल तसेच ६० हजार रुपयांची चोरीची होंडा शाईन दुचाकी आणि कुलूप तोडण्यासाठी वापरले जाणारे दोन मोठे स्क्रू ड्रायव्हर व पाना जप्त करण्यात आला.
जप्त केलेल्या पितळी समईवर एका नागरिकाचे नाव कोरलेले असल्याचे पोलिसांच्या तीक्ष्ण नजरेतून सुटले नाही. पोलिसांनी तात्काळ लाखनी पोलिसांशी संपर्क साधला असता, लाखनी भागात नुकतीच ही घरफोडी झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली. त्यामुळे पकडलेला आरोपी हा एका मोठ्या आंतरराज्यीय टोळीचा सदस्य असल्याचे उघड झाले आहे. पुढील तपासासाठी आरोपीसह जप्त मुद्देमाल लाखनी पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आला असून, फरार झालेल्या दुसऱ्या साथीदाराचा कसून शोध घेतला जात आहे.
ही धडक कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक गोरख भामरे, अप्पर पोलीस अधीक्षक अभय डोंगरे आणि देवरीचे उपविभागीय पोलीस अधिकारी राजेश तटकरे यांच्या मार्गदर्शनाखाली डुग्गीपारचे ठाणेदार कमलेश सोनटक्के, सहायक पोलीस निरीक्षक रूपाली पवार, परिविक्षाधीन पोलीस उपनिरीक्षक ऋषिकेश शेजाळ आणि पोलीस पथकाने केली. गुन्हेगारांनी कितीही सावधगिरी बाळगली तरी कायद्याच्या लांब हातांपासून ते सुटू शकत नाहीत, असा सज्जड दमच या कारवाईने पोलिसांनी दिला आहे.

Spread the News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *