दर्शनासाठी पायदळ जात असलेल्या बालकाला बिबट्याने उचलून नेले
झुडुपात आढळला जखमी बालक: उपचार सुरू
बल्लारपुर-चंद्रपूर मार्गावरील घटना
वनविभाग व भाविकांच्या मदतीने शोधमोहीम
बल्लारपूर/चंद्रपूर : माता महाकालीच्या दर्शनासाठी कुटुंबीयांसोबत पायी जात असलेल्या अवघ्या ८ वर्षांच्या चिमुरड्यावर दबा धरून बसलेल्या बिबट्याने अचानक झडप घालून त्याला जंगलात ओढून नेल्याची थरारक घटना बल्लारपूर-चंद्रपूर मार्गावर घडली. सुदैवाने, सुमारे दोन तासांच्या अथक शोधमोहिमेनंतर हा बालक रस्त्यालगतच्या झुडपात गंभीर जखमी अवस्थेत जिवंत सापडला. कार्तिक जाधव (वय ८) असे या बालकाचे नाव असून, त्याच्यावर सध्या चंद्रपूर येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
कार्तिक जाधव हा बल्लारपूर येथील ग्रामीण रुग्णालयाच्या मागील बाजूस असलेल्या शांतीनगर परिसरातील रहिवासी आहे. तो मूळचा हैदराबादचा असून दोन महिन्यांपूर्वीच बल्लारपूर येथे आपल्या आत्याच्या घरी आला होता. शनिवारी रात्री १०:१५ च्या सुमारास कार्तिक आपल्या कुटुंबीयांसह आणि शेजाऱ्यांसह (सुमारे ९ ते १० जण) चंद्रपूर येथील प्रसिद्ध माता महाकालीच्या दर्शनासाठी पायी निघाला होता. रात्री १०:३० वाजताच्या सुमारास हा जथा चुनाभट्टी प्रवासी निवाऱ्यापासून थोडा पुढे गेला असता, बॉटनिकल गार्डनच्या संरक्षण भिंतीवर दबा धरून बसलेल्या बिबट्याने अचानक कार्तिकवर झडप घातली आणि त्याला जबड्यात पकडून थेट जंगलात पळ काढला. कुटुंबीयांनी आरडाओरड केली; मात्र घनदाट अंधार आणि भीतीमुळे सुरुवातीला कोणाचेही धाडस झाले नाही.
भाविकांचे धाडस अन् शोधमोहीम
घटनेची माहिती मिळताच महाकाली दर्शनासाठी जाणाऱ्या इतर पदयात्री भाविकांची मोठी गर्दी जमली. काही धाडसी तरुणांनी टॉर्चच्या उजेडात जंगलाच्या दिशेने धाव घेतली. दरम्यान, घटनेचे गांभीर्य ओळखून वनविभाग आणि पोलीस प्रशासनाचे पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले. वनपरिक्षेत्र अधिकारी राजेंद्र घोरुडे आणि परिविक्षाधीन उपविभागीय पोलीस अधिकारी आपल्या चमूसह बॉटनिकल गार्डन आणि परिसरातील जंगलात शोध घेऊ लागले.
शुद्धीवर येताच वाजवली टाळी; नशिबाने वाचवला जीव
रात्री सुमारे १२:३० वाजता रस्त्यालगतच्या झुडपात कार्तिक बेशुद्धावस्थेत पडलेला आढळला. काही क्षणांनी शुद्ध आल्यावर त्याने हाताने टाळ्या वाजवून मदत मागितली. आवाजाच्या दिशेने धाव घेत पोलिसांनी त्याला तातडीने स्वतःच्या जिप्सीमध्ये टाकून चंद्रपूर जिल्हा सामान्य रुग्णालयात हलवले. बिबट्याचे दोन दात कार्तिकच्या मानेच्या दोन्ही बाजूंना खोलवर रुतले होते, तसेच डोक्यालाही गंभीर जखम झाली होती. रात्री १:३० च्या सुमारास त्याचा सीटी स्कॅन करण्यात आला. त्यानंतर वनपरिक्षेत्र अधिकारी राजेंद्र घोरुडे यांनी तात्काळ निर्णय घेऊन मध्यरात्री २:३० वाजता पुढील उपचारासाठी त्याला डॉ. मेहरा यांच्या रुग्णालयात हलवले. तेथे उपचारानंतर कार्तिकची प्रकृती स्थिर असल्याचे वैद्यकीय सूत्रांनी सांगितले. चिमुरडा सुखरूप व जिवंत सापडल्याने कुटुंबीयांसह प्रशासनाने सुटकेचा निःश्वास सोडला आहे.

