LatestNewsगोंदियाविदर्भ

नागपूरच्या ‘दिवा महोत्सवात’ झळकणार गोंदियातील शेणाच्या दिव्यांची चमक!

स्थानिक गो-पालक महिलांना मिळाला हक्काचा रोजगार : ‘गौ लक्ष्मी’ संस्थेचा पुढाकार
पर्यावरणपूरक दिवाळीचा दिला अनोखा संदेश
गोंदिया :
दिवाळी सण म्हणजे रोषणाई आणि मांगल्याचे प्रतीक; मात्र हीच दिवाळी प्रदूषणमुक्त, प्लास्टिकमुक्त आणि पूर्णपणे पर्यावरणपूरक व्हावी या उदात्त हेतूने नागपूर येथे आयोजित भव्य ‘दिवा महोत्सवा’मध्ये गोंदिया जिल्ह्याची वेगळी ओळख निर्माण होणार आहे. गोंदियातील चुटिया येथील महिलांनी देशी गाईच्या शेणापासून तयार केलेले आकर्षक आणि सुबक दिवे या महोत्सवाचे मुख्य आकर्षण ठरणार आहेत. या नावीन्यपूर्ण उपक्रमामुळे स्थानिक गो-पालक महिलांना गावातच रोजगाराची नवी संधी उपलब्ध झाली असून, पारंपरिक संस्कृती आणि निसर्ग संवर्धनाचा सुंदर संदेश दिला जात आहे.
नागपूर येथील प्रसिद्ध हॉटेल तुली इम्पेरिएल येथे २४ व २५ ऑक्टोबर दरम्यान दोन दिवसीय भव्य ‘दिवा महोत्सव’ आयोजित करण्यात आला आहे. या महोत्सवात राज्यभरातील विविध पर्यावरणपूरक उत्पादनांचे प्रदर्शन व विक्री स्टॉल्स उभारण्यात आले आहेत. यामध्ये गोंदिया शहरालगत असलेल्या चुटिया येथील ‘गौ लक्ष्मी’ संस्थेच्या स्टॉलला विशेष पसंती मिळत आहे.
देशी गीर गाईच्या शेणापासून विविध उत्पादने
गौ लक्ष्मी संस्थेच्या संचालिका प्रीती टेंभरे या गेल्या अनेक वर्षांपासून गो-आधारित उत्पादनांच्या क्षेत्रात कार्यरत आहेत. ग्रामीण भागातील महिलांना एकत्र करून त्यांनी देशी गीर गाईच्या शेणापासून सुबक कलाकुसर असलेले पर्यावरणपूरक दिवे, सुगंधी धूप, शुभ-लाभ, लक्ष्मी-गणेश मूर्ती, तोरणे आणि पूजेचे विविध साहित्य तयार करण्याचा यशस्वी प्रयोग राबविला आहे. केवळ व्यावसायिक नफा मिळवणे हा उद्देश न ठेवता, गाईचे शेण हे पवित्र व लक्ष्मीचे प्रतीक मानले जाते आणि या वस्तू वापरल्यानंतर पुन्हा मातीत मिसळून उत्कृष्ट सेंद्रिय खत म्हणून उपयोगात येतात, ही निसर्गपूरक संकल्पना त्या समाजात रुजवत आहेत.
महिला सक्षमीकरणाला मिळाली बळकटी
यंदाच्या दिवाळीत ‘गौ लक्ष्मी’ने तयार केलेल्या शेणाच्या दिव्यांना बाजारात प्रचंड मागणी नोंदविली जात आहे. नागपूरच्या दिवा महोत्सवात या उत्पादनांचे दालन लागल्यामुळे गोंदियाच्या ग्रामीण महिलांच्या हस्तकलेला राज्यस्तरावर मोठे व्यासपीठ मिळाले आहे. घरकाम सांभाळून या महिला स्वावलंबी बनत असून, गो-पालनालाही प्रोत्साहन मिळत आहे.
नागपूरकरांसाठी हा महोत्सव केवळ खरेदीचे केंद्र नसून, आपली संस्कृती, मातीचे नाते आणि निसर्ग संवर्धन यांची सुरेख सांगड घालणारा उत्सव ठरत आहे. गोंदियाच्या गो-पालक महिलांनी घेतलेल्या या भरारीचे सर्व स्तरांतून मनापासून कौतुक केले जात आहे.

Spread the News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *