दारूविक्रेत्यांचा माज उतरवण्यासाठी महिलांची वज्रमूठ !
राजगुडा ग्रामपंचायतीत दारूबंदीसाठी रणरागिणींचा एल्गार
५ गावे दणाणली, अवैध धंद्यांविरोधात महिलांचा थेट इशारा!
सडक अर्जुनी (गोंदिया ): गावातील शांतता, कौटुंबिक सौख्य आणि तरुणाईचे भविष्य उद्ध्वस्त करणाऱ्या अवैध दारूविक्रीविरोधात अखेर महिला शक्तीचा प्रचंड स्फोट झाला आहे. सडक अर्जुनी तालुक्यातील राजगुडा ग्रामपंचायतीच्या हद्दीत येणाऱ्या तब्बल पाच गावांमध्ये महिलांनी एकत्र येत दारू माफियांचे कंबरडे मोडण्यासाठी आक्रमक रणशिंग फुंकले. राजगुडा, सलंगटोला, मंदीटोला, मोठा मोगरा आणि लहान मोगरा या पाचही गावांमध्ये महिलांनी हातात फलक घेऊन काढलेल्या गगनभेदी रॅलीमुळे संपूर्ण परिसर दारूबंदीच्या घोषणांनी दुमदुमून गेला.
सुमारे दोन हजार लोकसंख्या असलेल्या या पाच गावांमध्ये काही विकृत दुकानदारांकडून छुप्या व उघड पद्धतीने अवैध दारूविक्री सुरू असल्याने अनेक संसार रस्त्यावर आले आहेत. दारूच्या व्यसनामुळे गावात दररोज होणारी भांडणे, महिलांवर होणारे अत्याचार आणि गरिबांच्या घरात पडणारा भुकेचा आक्रोश पाहून अखेर महिला बचत गट आणि ग्रामस्थांनी ‘आता सहन करायचे नाही’ असा निर्धार करत थेट रस्त्यावर उतरण्याचा निर्णय घेतला. मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान (सन २०२६-२७) अंतर्गत महिलांनी ही निर्णायक लढाई सुरू केली असून, या मोहिमेला मिळालेल्या विराट प्रतिसादामुळे अवैध दारूविक्रेत्यांचे धाबे पुरते दणाणले आहेत.
गावागावांतून निघालेल्या या धडक रॅलीला डुग्गीपार पोलीस ठाण्याचे बीट जमादार विजय कोटांगले, गणेश पवार आणि ग्रामविकास अधिकारी टी. आर. जनबंधू यांची उपस्थिती होती. या उपक्रमात सरपंच सुषमाबाई मरस्कुले, उपसरपंच लेखलाल टेकाम, अध्यक्ष शांताबाई संयम यांच्या नेतृत्वात अरुण लेदे, वर्षा लाडे, अनिता लेदे, देवानंद गेडाम, रंजूताई पटणे, पुष्पमाला पंचभाई, शिल्पा मेश्राम, सीमा घासले, पुरणलाल कोडापे, डी. एच. पटणे, संघपाल वैद्य, लिकुताई मडावी, लता कडपते, कुंदा पटणे, सीमा पटणे, सूत्रधार मेश्राम, भैयालाल मडावी, वामन मरस्कोले, गोपालभाऊ शेडमते यांच्यासह शेकडो रणरागिणी मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या. महिलांनी आता केवळ रॅली काढून इशारा दिला असून, गावातील छुप्या दारूविक्रेत्यांनी तात्काळ आपले काळे धंदे बंद करावेत; अन्यथा दारूच्या अड्ड्यांवर थेट धाडी घालून बाटल्या फोडल्या जातील आणि विक्रेत्यांना धडा शिकवला जाईल, असा सज्जड दम महिलांनी दिला आहे. पोलिसांनीही केवळ कागदी कारवाई न करता या दारू माफियांची पाळेमुळे खणून काढून पाचही गावे त्वरित ‘दारूमुक्त’ करावीत, अशी जोरदार मागणी आता जोर धरत आहे.

