पोल्ट्री फार्मच्या आडून सुरू होता ड्रग्जचा कारखाना; तिरोडा पोलिसांचा छापा
हैदराबादच्या ‘ईगल फोर्स’च्या इनपुटवरून मोठी कारवाई
नागपूरच्या दोघांवर एनडीपीएस कायद्यांतर्गत गुन्हा दाखल
तिरोडा (गोंदिया) : पोल्ट्री फार्मच्या नावाखाली छुप्या पद्धतीने अमली पदार्थ (ड्रग्ज) तयार करण्याचे युनिट उभारण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार तिरोडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत उघडकीस आला आहे. हैदराबादच्या ‘ईगल फोर्स’कडून मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी रविवारी, १८ ऑक्टोबरच्या रात्री मारेगाव शिवारातील एका पोल्ट्री फार्मवर अचानक छापा टाकला. या कारवाईत अमली पदार्थ निर्मितीसाठी लागणारे विविध रासायनिक द्रव्ये, ड्रम्स आणि इतर उपकरणांसह एकूण ४४ हजार ८१० रुपयांचे साहित्य जप्त करण्यात आले आहे. या प्रकरणी जागेच्या मालकासह नागपूरच्या दोन संशयितांविरुद्ध एनडीपीएस कायद्यान्वये (NDPS Act) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जितेंद्र गोविंद टेंभरे (जागेचा कब्जेदार), हर्षदीप रत्नदीप टेंभरे (वय २५, रा. ज्योतीनगर, लश्करी बाग, नागपूर) आणि चेतन मधुकर मेश्राम (वय ४९, रा. लश्करी बाग, नागपूर) अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत.
#Vidarbha #VidarbhaUpdates #Gondia #Wardha #Nagpur #Bhandara #Chandrapur #Gadchiroli #Maharashtra #LocalNews #MarathiNews
हैदराबाद येथील ‘ईगल फोर्स’चे पोलीस निरीक्षक व्ही. शिवकुमार यांनी दिलेल्या अधिकृत गोपनीय पत्रावरून गोंदिया पोलिसांना ही धक्कादायक माहिती मिळाली होती. मारेगाव शिवारातील जितेंद्र टेंभरे यांच्या शेतजमिनीवर असलेल्या पोल्ट्री फार्ममध्ये अमली पदार्थ तयार करण्यासाठी रासायनिक प्रक्रिया करणारे युनिट उभारण्यात आल्याचे पत्रात नमूद होते. या माहितीचे गांभीर्य ओळखून तिरोडा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अमित वानखडे यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांना तात्काळ अवगत करत शोधमोहिमेची परवानगी मिळवली. तसेच तपासाच्या मदतीसाठी नागपूर येथील प्रादेशिक न्याय सहायक वैज्ञानिक प्रयोगशाळेच्या (फॉरेन्सिक लॅब) तज्ज्ञ पथकाला पाचारण करण्यात आले.
बंद खोल्यांमध्ये आढळले रासायनिक साहित्याचे ड्रम
पोलिसांचे पथक मारेगाव शिवारातील संबंधित पोल्ट्री फार्मवर पोहोचले असता, त्या ठिकाणी जागेचा कब्जेदार जितेंद्र टेंभरे हजर होता. पोलिसांनी पाहणी केली असता, त्या ठिकाणी दक्षिण दिशेला तीन खोल्यांची जुनी आरसीसी इमारत दिसून आली. त्यापैकी दोन खोल्यांच्या कुलुपांना गंज लागलेला होता, ज्यामुळे या खोल्या बऱ्याच काळापासून बंद असल्याचे प्रथमदर्शनी स्पष्ट झाले. पंचांच्या समक्ष या खोल्यांचे कुलूप तोडून झडती घेतली असता, एका खोलीत जुने सामान, दुसऱ्या खोलीत निळ्या रंगाचे व लोखंडी धातूचे मोठे ड्रम तसेच रासायनिक साहित्य आढळले, तर तिसऱ्या खोलीत कूलर व प्लास्टिकचे टब मिळून आले.
भाडेतत्त्वावर दिली होती जागा; एनडीपीएस अंतर्गत कारवाई
घटनास्थळावरून पोलिसांनी ३५ हजार ७०० रुपये किमतीचे रासायनिक द्रव्ये व साहित्य आणि ९ हजार ११० रुपयांचे उपकरणे असा एकूण ४४ हजार ८१० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. पोलिसांनी जितेंद्र टेंभरे याच्याकडे चौकशी केली असता, चेतन मेश्रामच्या मध्यस्थीने जुलै २०२४ मध्ये ही जागा हर्षदीप टेंभरे याला भाडेतत्त्वावर देण्यात आली होती आणि सप्टेंबर २०२४ मध्ये या संदर्भातील नोटरी करण्यात आल्याचे त्याने सांगितले.
या प्रकरणी पोलिसांनी तिन्ही आरोपींविरुद्ध अमली पदार्थ प्रतिबंधक कायदा (NDPS Act), १९८५ मधील कलम ८(सी), २२, २५, २९ आणि ३० अन्वये गुन्हा नोंदवला आहे. ही धडक कारवाई गोंदियाचे पोलीस अधीक्षक गोरख भामरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अमित वानखडे, सहायक पोलीस निरीक्षक संजय कवडे, पोलीस उपनिरीक्षक शुभम नफ्ते, माधव मुंगोले, हवालदार निलपप्रेवार, शिपाई प्रणव तिवारी, शैलेश पटले, अमित गायकवाड, राहुल पेशणे, गीता धुर्वे, धनंजय बारई, कैलास ठाकरे आणि अनिल इलमे यांनी पार पाडली. शांत मानल्या जाणाऱ्या गोंदिया ग्रामीण भागात थेट ड्रग्ज निर्मितीचे धागेदोरे मिळाल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.

