आमगाव पोलिसांनी शोधले हरवलेले १८ मोबाईल
सव्वादोन लाखांचा मुद्देमाल मूळ मालकांच्या स्वाधीन
आमगाव (गोंदिया): मोबाईल गहाळ झाल्यानंतर तो परत मिळण्याची आशा सोडून बसलेल्या निष्पाप नागरिकांसाठी आमगाव पोलीस देवदूत ठरले आहेत. मागील चार महिन्यांत आमगाव परिसरातून हरवलेले तब्बल २ लाख ३० हजार रुपये किमतीचे १८ महागडे मोबाईल हँडसेट पोलिसांनी अत्याधुनिक सायबर तंत्रज्ञानाच्या जोरावर शोधून काढले आहेत. २३ ऑक्टोबर रोजी पोलीस निरीक्षक निळकंठ कुकडे यांच्या हस्ते हे सर्व मोबाईल त्यांच्या मूळ मालकांच्या हाती सुपूर्द करण्यात आले असून, दिवाळीच्या तोंडावर आपला हरवलेला फोन परत मिळाल्याने नागरिकांच्या चेहऱ्यावर आनंदाचे तेज झळकले आहे.
नागरिकांचे मोबाईल हरवल्यानंतर अनेकदा त्याकडे दुर्लक्ष केले जाते; मात्र आमगाव पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या तक्रारींची ठाणेदार निळकंठ कुकडे यांनी अत्यंत गांभीर्याने दखल घेतली. त्यांनी तातडीने गुन्हे प्रकटीकरण शाखेला (DB पथक) कामाला लावले. गुन्हे प्रकटीकरण शाखेचे अंमलदार चेतन शेंडे यांनी केंद्र सरकारच्या ‘सेंट्रल इक्विपमेंट आयडेंटिटी रजिस्टर’ (CEIR) पोर्टलवर या सर्व गहाळ मोबाईलची माहिती अचूकपणे नोंदवून तांत्रिक तपास सुरू केला. सायबर कौशल्याचा चोख वापर करून एकापाठोपाठ एक अशा तब्बल १८ मोबाईलचे लोकेशन शोधून काढत पोलिसांनी ते ताब्यात घेतले.
पोलीस ठाण्यात बोलावून जेव्हा नागरिकांना त्यांचे मूळ मोबाईल परत करण्यात आले, तेव्हा उपस्थित नागरिकांनी पोलिसांप्रती कृतज्ञता व्यक्त केली. सामान्य जनतेच्या साध्या तक्रारींचीही वेळेवर दखल घेऊन लाखो रुपयांचा ऐवज परत मिळवून देणाऱ्या पोलिसांच्या या धडक व लोकाभिमुख कामगिरीचे संपूर्ण परिसरातून जोरदार कौतुक होत आहे.
ही कौतुकास्पद कामगिरी जिल्हा पोलीस अधीक्षक गोरख भामरे, अप्पर पोलीस अधीक्षक अभय डोंगरे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि उपविभागीय पोलीस अधिकारी नंदिनी चानपुरकर यांच्या नेतृत्वात पार पडली. या मोहिमेत पोलीस निरीक्षक निळकंठ कुकडे, पोलीस हवालदार असीम मन्यार (ब.नं. २०८८), पोलीस शिपाई चेतन शेंडे (ब.नं. ४७१), अजय पटले (ब.नं. २०९०) आणि मिलनसिंग मंजुटे (ब.नं. १३११) यांनी मोलाची भूमिका बजावली. खाकी वर्दीतील रक्षकांनी पुन्हा एकदा जनसामान्यांचा विश्वास जिंकून दाखवला आहे.

