कोरणी घाटावर दुर्गा-शारदा विसर्जनादरम्यान जड वाहनांसाठी पर्यायी मार्ग जाहीर!
२० ते २२ ऑक्टोबरदरम्यान सायंकाळी ६ ते पहाटे ४ वाजेपर्यंत वाहतूक वळविली : जिल्हाधिकारी मंदार पत्की यांचे आदेश
गोंदिया : वाघनदीवरील कोरणी घाट येथे दुर्गा व शारदा मूर्ती विसर्जन सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर वाहतूक कोंडी टाळण्यासाठी आणि सुरक्षिततेच्या दृष्टीने जिल्हा प्रशासनाने महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. विसर्जन मिरवणुकांदरम्यान कोरणी घाट मार्गावरील सर्व प्रकारच्या जड व अवजड वाहनांची वाहतूक पर्यायी मार्गाने वळविण्याचे अधिकृत आदेश जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी मंदार पत्की यांनी जारी केले आहेत.
हे वाहतूक निर्बंध दिनांक २०, २१ आणि २२ ऑक्टोबर रोजी दररोज सायंकाळी ६ वाजेपासून ते दुसऱ्या दिवशी पहाटे ४ वाजेपर्यंत लागू राहतील. या कालावधीत गोंदियामार्गे बालाघाटकडे जाणाऱ्या तसेच बालाघाटकडून येणाऱ्या अवजड वाहनांना रजेगाव (छोटा) फाट्यावरून पर्यायी मार्गाचा वापर करावा लागणार आहे.
वाघनदी पुलावर गर्दीची शक्यता; खबरदारीचा उपाय
कोरणी घाटावरील वाघनदीचा पूल हा महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश या दोन्ही राज्यांना जोडणारा अत्यंत वर्दळीचा व आंतरराज्यीय वाहतुकीचा मुख्य मार्ग आहे. नवरात्रोत्सवाच्या सांगतेनंतर गोंदिया शहर व परिसरातील शेकडो सार्वजनिक दुर्गा व शारदा उत्सव मंडळे मूर्ती विसर्जनासाठी कोरणी घाटावर दाखल होतात. विसर्जन काळात भाविक आणि वाहनांची प्रचंड गर्दी होत असल्याने अपघात आणि भीषण वाहतूक कोंडी होण्याची दाट शक्यता असते. ही संभाव्य अडचण लक्षात घेऊन जिल्हादंडाधिकाऱ्यांनी मोटार वाहन अधिनियम, १९८८ च्या कलम ११५ अन्वये वाहतूक नियमनाचे हे प्रतिबंधात्मक आदेश जारी केले आहेत.
प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन
विसर्जन उत्सव शांततेत, उत्साहात आणि सुरक्षित वातावरणात पार पाडण्यासाठी सर्व वाहनचालक, वाहतूकदार व नागरिकांनी सहकार्य करावे. जड वाहनधारकांनी सायंकाळी ६ ते पहाटे ४ या वेळेत कोरणी घाट मार्गावर प्रवेश न करता निश्चित केलेल्या पर्यायी मार्गाचाच वापर करावा, असे आवाहन जिल्हाधिकारी मंदार पत्की यांनी केले आहे.

