LatestNewsगोंदियाविदर्भ

नर्सिंग विद्यार्थिनींच्या रोषाचा उद्रेक! अधिष्ठाता कार्यालयात १०० हून अधिक विद्यार्थिनींचा ठिय्या

AISF च्या आक्रमक आंदोलनापुढे झुकले प्रशासन
दीड महिन्यात मागण्या मान्य करण्याचे लेखी आश्वासन!
गोंदिया :
वसतिगृहाचा गंभीर प्रश्न, मूलभूत सुविधांचा अभाव आणि खोल्या खाली करण्यासाठी होणाऱ्या त्रासाविरोधात अखेर शासकीय परिचर्या महाविद्यालयातील (नर्सिंग) विद्यार्थिनींच्या संतापाचा स्फोट झाला. ऑल इंडिया स्टुडंट्स फेडरेशनच्या (AISF) नेतृत्वाखाली १०० हून अधिक नर्सिंग विद्यार्थिनींनी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठाता कार्यालयावर थेट धडक मारून ठिय्या आंदोलन छेडले. वारंवार अल्टिमेटम देऊनही कुंभकर्णी झोपेत असलेल्या प्रशासनाचे या आक्रमक आंदोलनामुळे धाबे दणाणले असून, पोलिसांच्या मध्यस्थीनंतर अखेर दीड महिन्यात सर्व समस्या मार्गी लावण्याचे आश्वासन अधिष्ठात्यांना द्यावे लागले.
विद्यार्थ्यांच्या वसतिगृहातील समस्या, अद्ययावत प्रयोगशाळा, ग्रंथालय, अनुभवी प्राध्यापक, वर्गखोल्या, नियमित प्रात्यक्षिक वर्ग आणि मेसच्या दुरवस्थेबाबत ८ ऑक्टोबर रोजी प्रशासनाला स्पष्ट निवेदन देण्यात आले होते. मात्र, निष्क्रिय प्रशासनाने यावर उपाययोजना करण्याऐवजी नर्सिंगच्या विद्यार्थिनींवर खोल्या खाली करण्याचा दबाव आणून एमबीबीएसच्या विद्यार्थिनींना त्या ठिकाणी पाठवण्याचा अजब कारभार केला. या नियोजनशून्य कारभारामुळे दोन विद्यार्थी गटांमध्येच अनावश्यक तणाव निर्माण करण्यात आला, असा थेट आरोप संघटनेने केला आहे. या गंभीर प्रकाराबाबत २३ ऑक्टोबर रोजी थेट पोलीस अधीक्षक व संबंधित ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली होती.
आज २४ ऑक्टोबर रोजी शेकडो विद्यार्थिनींनी थेट अधिष्ठाता कार्यालयात घुसून प्रशासनाविरोधात घोषणाबाजी सुरू केल्याने वैद्यकीय महाविद्यालय परिसरात प्रचंड तणाव निर्माण झाला. आंदोलनाची तीव्रता पाहून पोलीस प्रशासनाला पाचारण करावे लागले. पोलिसांच्या मध्यस्थीनंतर विद्यार्थी प्रतिनिधी, संघटना पदाधिकारी आणि अधिष्ठाता यांच्यात दीर्घ चर्चा झाली. अखेर अधिष्ठात्यांनी नरमाईची भूमिका घेत येत्या दीड महिन्याच्या आत सर्व प्रलंबित समस्यांचे तात्काळ निराकरण करण्याचे आश्वासन दिले; त्यानंतर हे आंदोलन तात्पुरते स्थगित करण्यात आले.
प्रशासनाने दिलेले आश्वासन हवेत विरल्यास गप्प बसणार नाही, असा सज्जड दम AISF ने दिला आहे. “विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक हक्कांशी खेळणाऱ्या प्रशासनाला आम्ही वठणीवर आणल्याशिवाय राहणार नाही; दिलेल्या मुदतीत काम झाले नाही, तर यापेक्षाही तीव्र आणि निर्णायक संघर्ष छेडू,” असा थेट इशारा AISF चे राज्य अध्यक्ष वैभव चोपकर यांनी दिला. या आंदोलनात प्रणय बडवाईक यांच्यासह नर्सिंगचे शेकडो विद्यार्थी मोठ्या संख्येने मैदानात उतरले होते.

Spread the News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *