गोंदिया-जबलपूर दुहेरी रेल्वेमार्गाचे सर्वेक्षण पूर्ण; प्रकल्पाच्या कामाला वेग मिळणार!
उत्तर-दक्षिण रेल्वे संपर्काला मोठी बळकटी : तीन विभागात प्रकल्पाचा विस्तार, प्रवाशांना उत्तम सुविधा मिळणार
गोंदिया : विदर्भातील गोंदिया ते मध्य प्रदेशातील जबलपुर दरम्यानच्या २३९ किलोमीटर लांबीच्या रेल्वेमार्गाच्या दुहेरीकरण प्रकल्पाच्या कामाला आता वेग आला आहे. ५,२३५.७९ कोटी रुपयांच्या या महत्त्वपूर्ण प्रकल्पामुळे महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशातील रेल्वे संपर्कात मोठी वाढ होणार असून, उत्तर व दक्षिण भारतादरम्यानचा रेल्वे प्रवास अधिक जलद आणि सोयीचा होणार आहे. या रेल्वे मार्गाच्या दुहेरीकरणाचे सर्वेक्षण नुकतेच पूर्ण झाले आहे.
हा प्रकल्प गोंदिया-बालाघाट, बालाघाट-नैनपूर आणि नैनपूर-जबलपूर अशा तीन टप्प्यांत किंवा भागांत राबविला जाणार आहे. या संपूर्ण मार्गावर एकूण २३ स्थानके असून, त्यापैकी सुमारे १८ किलोमीटरचा रेल्वेमार्ग महाराष्ट्रात तर २१३ किलोमीटरचा भाग मध्य प्रदेशात येतो. यात गोंदिया, प्रतापबाग, बिरसोला, हट्टा रोड, बालाघाट, धापेवाडा, समनापूर, चारगाव, लामटा, घनसौर, पिपरिया, गवारीघाट, गढा आणि कछपुरा आदी रेल्वे स्थानकांचा समावेश आहे.
दुहेरीकरणामुळे या रेल्वेमार्गाची क्षमता लक्षणीयरीत्या वाढेल. यामुळे अधिक प्रवासी गाड्या आणि मालगाड्या चालवणे शक्य होणार असून, गाड्यांच्या वेळेची अचूकता सुधारण्यास मोठी मदत होईल. गोंदिया येथे हावडा-मुंबई रेल्वेमार्ग आणि जबलपुर येथे इटारसी-वाराणसी मार्ग या रेल्वेला जोडलेला असल्याने, हा मार्ग वाराणसी, प्रयागराज, चेन्नई, बंगळुरू आणि हैदराबादशी जोडण्यासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण ठरेल.
रोजगार आणि पर्यटनाला मिळणार मोठी चालना
या प्रकल्पाच्या बांधकामादरम्यान सुमारे ७८ लाख मानव दिवसांचा रोजगार निर्माण होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. वन्यजीवांच्या सुरक्षित हालचालीसाठी अंडरपास आणि कुंपणाची तरतूदही या प्रकल्पात करण्यात आली आहे. गोंदियासह बालाघाट, शिवनी, मंडला आणि जबलपुर जिल्ह्यांना या प्रकल्पाचा थेट फायदा होणार आहे. कान्हा राष्ट्रीय उद्यान, पेंच व्याघ्र प्रकल्प आणि धुंवाधार धबधब्यासारख्या प्रमुख पर्यटनस्थळांपर्यंत रेल्वेने पोहोचणे अधिक सुलभ होईल. तसेच अयोध्या, वाराणसी, प्रयागराज, रामेश्वरम आणि मदुराईसारख्या धार्मिक स्थळांपर्यंत पोहोचण्यासाठीचा प्रवास अधिक सोयीचा होणार आहे.
परवानग्या मिळाल्यानंतर निविदा प्रक्रिया सुरू होणार
या मार्गावर एकूण ५०७ पुलांची निर्मिती प्रस्तावित असून, जवळपास सर्व पुलांची सामान्य नमुना रचना तयार झाली आहे. तसेच २३ पैकी २१ स्थानकांचे यार्ड नकाशे तयार झाले आहेत. या प्रकल्पांतर्गत १० नवीन स्थानक इमारती उभारल्या जाणार आहेत, तर ३९ ठिकाणी वीज, पाणी आणि इतर सुविधांचे स्थलांतर करावे लागणार आहे. गोंदिया-बालाघाट-नैनपूर व नैनपूर-जबलपूर विभागांसाठी वन परवानग्या मिळाल्यानंतर तत्काळ निविदा प्रक्रिया सुरू होईल.
स्थानिक अर्थव्यवस्थेला मिळणार गती
वीजनिर्मिती केंद्र, शस्त्रास्त्र कारखाने आणि खाणींना या रेल्वेमार्गामुळे चांगला मालवाहतूक संपर्क मिळणार आहे. यामुळे औद्योगिक विकास, व्यापार आणि स्थानिक अर्थव्यवस्थेला मोठी चालना मिळण्याची अपेक्षा आहे. गोंदिया-जबलपूर दुहेरीकरण प्रकल्प केवळ रेल्वे सुविधा वाढवणारा नसून, विदर्भ आणि मध्य प्रदेशातील सर्वांगीण विकासाला नवी गती देणारा ठरणार आहे.

