LatestNewsगोंदिया- भंडारामहाराष्ट्र

आपत्ती व्यवस्थापनामध्ये वेळेवर प्रतिसाद देणे महत्वाचे-निवासी उपजिल्हाधिकारी भैय्यासाहेब बेहेरे

कचारगड यात्रा व्यवस्थापनासाठी मॉकड्रील

गोंदिया, ‍दि.30 : कचारगड देवस्थान आदिवासी बांधवांचे श्रध्दास्थळ असून विविध राज्यातून लाखोंच्या संख्येने भाविक या पाच दिवसीय यात्रेत येतात. त्यामुळे यात्रा व्यवस्थापन व गर्दीचे नियंत्रण करण्यासाठी संबंधित विभागांची क्षमता तपासणी आवश्यक आसल्याने आपत्तीच्या वेळेत संबंधित यंत्रणांचे वेळेवर प्रतिसाद महत्वाचे आहेत. यामुळे आपत्तीची तिव्रता कमी करुन जिवित व वित्तीय हानीचे प्रमाण कमी करण्यास मदत मिळते, असे प्रतिपादन निवासी उपजिल्हाधिकारी भैय्यासाहेब बेहेरे यांनी केले.

पारी कोपार लिंगो माँ कली कंकाली देवस्थान समाज भवन कचारगड येथे आज यात्रेच्या पुर्वतयारीच्या अनुषंगाने आपत्ती व्यवस्थापन संदर्भात मॉकड्रील करण्यात आले, त्यावेळी श्री. बेहेरे बोलत होते. यावेळी अपर पोलीस अधीक्षक अभय डोंगरे, उपविभागीय अधिकारी कविता गायकवाड, तहसिलदार नरसय्या कोंडागुर्ले, पोलीस उपअधीक्षक प्रमोद मडामे, कोसमतर्रा ग्रामपंचायत सरपंच सिंधू घरत, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी राजन चौबे, पोलीस निरीक्षक भुषण बुराडे उपस्थित होते. श्री. बेहेरे म्हणाले, आदिवासी बांधवाचे श्रध्दास्थान असलेले कचारगड येथे दि.30 जानेवारी ते 3 फेब्रुवारी 2026 या पाच दिवसीय कालावधीत यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. या यात्रेत पाच ते सात लाख भाविकांची उपस्थिती राहणार आहे, त्यामुळे पोलीस विभागाने बॅरिकेटींग करुन गर्दीचे व्यवस्थापन सुव्यवस्थीत करावे. गर्दीमध्ये अनावधानाने एखाद्या ठिकाणी आग लागली तर आगीवर नियंत्रण करण्यासाठी संबंधित विभागाने दक्ष राहून आपसात समन्वय ठेवून काम करावे. गर्दीचे व्यवस्थापन करणे सोईचे होण्यासाठी दुकानदारांनी पुरेसे अंतर ठेवून दुकाने लावावी. या ठिकाणी अन्नाची विषबाधा होणार नाही यासाठी अन्न व औषध प्रशासन विभागाने योग्य ती दक्षता घ्यावी. कचारगड हे स्थळ घनदाट जंगलात असल्यामुळे अनावधानाने कोणाला जर विंचू चावला किंवा साप चावला तर त्यासाठी आरोग्य विभागाने लस उपलब्ध ठेवावी, तसेच नागरिकांसाठी पुरेशा प्रमाणात औषधसाठा उपलब्ध ठेवावा. सर्व संबंधित विभागांनी आपसात समन्वय ठेवून कामे करावी. स्वयंसेवकांनी आपली जबाबदारी पार पाडावी. यात्रेच्या ठिकाणी नागरिकांनी शांतता ठेवावी. कोणतीही अफवा पसरवू नये, असे त्यांनी यावेळी सांगितले.

याप्रसंगी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण गोंदियातर्फे विविध घटनेदरम्यान आपत्ती व्यवस्थापनाचे प्रात्यक्षिक करुन दाखवून उपस्थितांना माहिती देऊन जनजागृती करण्यात आली. यात्रा व्यवस्थापनामध्ये गर्दीच्या ठिकाणी चेंगरा-चेंगरी, आगीच्या घटना, रस्ते अपघात, अफवाह पसरविणे इत्यादी बाबींवर मॉकड्रीलचे आयोजन करण्यात आले. यावेळी सार्वजनिक बांधकाम, विद्युत महामंडळ, आरोग्य, अग्नीशमन, ग्रामीण पाणीपुरवठा, पोलीस व इतर संबंधित विभागाचे अधिकारी व कर्मचारी तसेच कचारगड यात्रा समितीचे पदाधिकारी उपस्थित होते.

Spread the News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *