धान उत्पादक शेतकर्यांना मोठा दिलासा; २०८.८८ कोटींचा निधी मंजूर
आ. विनोद अग्रवाल यांच्या पाठपुराव्याला यश
शेतकर्यांच्या खात्यात लवकरच रक्कम जमा होणार
उर्वरित थकबाकीसाठीही प्रयत्न सुरू
प्रतिनिधी । गोंदिया
गोंदिया जिल्ह्यातील धान उत्पादक शेतकर्यांसाठी एक अत्यंत आनंदाची आणि दिलासादायक बातमी समोर आली आहे. गेल्या काही दिवसांपासून प्रलंबित असलेल्या धानाच्या चुकार्यांसाठी (पेमेंट) गोंदियाचे आमदार विनोद अग्रवाल यांनी केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला मोठे यश आले आहे. राज्य सरकारने धान उत्पादक शेतकर्यांच्या थकीत देयकांसाठी २०८ कोटी ८८ लाख रुपयांचा निधी मंजूर केला असून, यामुळे हजारो शेतकर्यांची प्रतीक्षा संपणार आहे.
आमदार विनोद अग्रवाल यांची ओळख जनसामान्यांचे आणि विशेषतः शेतकर्यांचे प्रश्न आक्रमकपणे मांडणारे लोकप्रतिनिधी म्हणून आहे. यंदाच्या हंगामात शेतकर्यांनी शासनाला धान विकले होते, मात्र त्याचे पैसे वेळेवर मिळत नसल्याने शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला होता. ही बाब गांभीर्याने घेत आ. अग्रवाल यांनी विधानसभेत सरकारचे लक्ष वेधले होते.

केवळ सभागृहात प्रश्न मांडून न थांबता, त्यांनी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबल यांची प्रत्यक्ष भेट घेतली. शेतकर्यांची आर्थिक ओढाताण थांबवण्यासाठी तात्काळ निधी उपलब्ध करून देण्याची मागणी त्यांनी लावून धरली होती. सरकारने मंजूर केलेल्या या २०८.८८ कोटी रुपयांच्या निधीतून सुमारे २५ लाख १५ हजार क्विंटल धानाचे चुकारे शेतकर्यांना अदा केले जाणार आहेत. ज्या शेतकर्यांनी ३१ जानेवारीपर्यंत शासनाच्या केंद्रावर धानाची विक्री केली आहे, त्यांच्या बँक खात्यात येत्या काही दिवसांत ही रक्कम थेट जमा होण्यास सुरुवात होईल.
सध्या जरी मोठा निधी मंजूर झाला असला, तरी सुमारे ५० हजार क्विंटल धानाचे चुकारे अद्याप तांत्रिक कारणास्तव किंवा निधीअभावी प्रलंबित आहेत. हे उर्वरित पैसेही ३१ मार्च या आर्थिक वर्षाच्या समाप्तीपूर्वी शेतकर्यांच्या हातात मिळावेत, यासाठी आ. अग्रवाल सध्या प्रयत्नशील आहेत. याशिवाय, अनेक शेतकर्यांकडे मर्यादेपेक्षा जास्त धान उत्पादन झाले असल्याने, ‘धान खरेदीची मर्यादा’ वाढवून मिळावी, अशी मागणीही त्यांनी सरकारकडे केली आहे.
……………………
शेतकर्यांकडून समाधान व्यक्त
ऐन शेतीच्या कामांच्या वेळी आणि आर्थिक गरजांच्या काळात हक्काचे पैसे मिळणार असल्याने शेतकर्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. आमदार विनोद अग्रवाल यांनी दाखवलेली तत्परता आणि सरकारकडे केलेला यशस्वी पाठपुरावा यामुळे शेतकर्यांनी त्यांचे आभार मानले आहेत. आ. अग्रवाल यांनीही या निर्णयाबद्दल राज्य सरकारचे आभार मानले असून, प्रलंबित मागण्याही लवकरच पूर्ण होतील असा विश्वास व्यक्त केला आहे.

