शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी ताकदीने प्रयत्न करणार: खा. प्रफुल्ल पटेल
रेल्वे भू-संपादनाच्या विषयाला घेवून जमीन बचाओ संघर्ष समितीचे निवेदन
गोरेगाव : डोंगरागढ-गोंदिया चौथ्या रेल्वे मार्गासाठी करण्यात येणाऱ्या भूमीसंपादनाचा प्रश्न आता अधिक तीव्र झाला असून, शेतकऱ्यांच्या जमिनी वाचवण्यासाठी ‘जमीन बचाओ संघर्ष समिती’ने पुढाकार घेतला आहे. या प्रश्नावर तात्काळ हस्तक्षेप करून शेतकऱ्यांना न्याय मिळवून द्यावा, या मागणीसाठी समितीने १६ ऑक्टोबर रोजी खासदार प्रफुल्ल पटेल यांची भेट घेऊन निवेदन सादर केले. खा. प्रफुल्ल पटेल यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नावर सकारात्मक भूमिका घेत न्याय मिळवून देण्यासाठी पूर्ण ताकदीने प्रयत्न करण्याची ग्वाही शेतकऱ्यांना दिली.
सुपीक जमीन जाण्याच्या भीतीने शेतकरी चिंतेत
डोंगरागढ-गोंदिया चौथ्या रेल्वे मार्गाच्या भूमीसंपादनामुळे तुमखेडा बुजुर्ग, डब्बा, गणखैरा, हिरडामाळी, गोरेगाव, खमारी, दागोटोला, तुमखेडा खुर्द, कारंजा आणि हलबीटोला परिसरातील शेतकऱ्यांमध्ये चिंता व्यक्त केली जात आहे. या भागातील अनेक कुटुंबांचा उदरनिर्वाह शेतीवर अवलंबून असल्याने सुपीक शेतजमीन संपादित झाल्यास त्यांच्या उपजीविकेचा प्रश्न निर्माण होईल, अशी भूमिका समितीने निवेदनात मांडली. तसेच, रेल्वे प्रशासनाकडून भूमीसंपादन प्रक्रियेबाबत शेतकऱ्यांना पुरेशी माहिती दिली जात नसल्याचा आणि शेतकऱ्यांच्या हरकतींकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप शिष्टमंडळाने केला. हरकतींची भूमीसंपादनासंदर्भातील योग्य दखल घेऊन शेतकऱ्यांचे म्हणणे ऐकून घ्यावे, त्यांच्या हिताचे संरक्षण करावे आणि न्याय्य तोडगा काढावा, अशी मागणी यावेळी करण्यात आली.
खासदार पटेल यांची जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा
प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन खा. प्रफुल्ल पटेल यांनी तात्काळ जिल्हाधिकाऱ्यांशी दूरध्वनीवरून चर्चा केली. यामुळे भूमीसंपादनाच्या प्रकरणावर आता प्रशासनाकडून कोणती भूमिका घेतली जाते, याकडे संबंधित गावातील शेतकऱ्यांचे लक्ष लागून आहे. शिष्टमंडळात जमीन बचाओ संघर्ष समितीचे अध्यक्ष लिलाधर चंद्रिकापुरे, दीपक टेंभुर्णे, उपाध्यक्ष लोकचंद टेंभरे, सचिव अमित अग्रवाल, जिल्हा परिषद सदस्य पंकज रहांगडाले, माजी आ. खोमेश्वर रहांगडाले यांच्यासह परिसरातील महिला व पुरुष शेतकरी मोठ्या संख्येने समाविष्ट होते.

