LatestNewsगोंदिया- भंडारामहाराष्ट्र

‘प्राईड ऑफ महाराष्ट्र’ सौंदर्य स्पर्धेत गोंदियाचा डंका; गोरेगावची रूपाली पारधी ठरली ‘फर्स्ट रनर अप’!

नागपुरात रंगला ‘स्टार वॉक पूनम प्रॉडक्शन’चा दिमाखदार फॅशन रनवे शो
प्रसिद्ध अभिनेत्री आयना सिंग यांच्या हस्ते पाथरीच्या रूपालीला मानाचा किताब प्रदान
गोंदिया/गोरेगाव :
नागपूर येथे रंगलेल्या राज्यस्तरीय सौंदर्य स्पर्धेत गोंदिया जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे. गोरेगाव तालुक्यातील पाथरी येथील अष्टपैलू युवती रूपाली पारधी हिने ‘ब्युटी पेजेंट फॅशन रनवे – ६ वे प्राईड ऑफ महाराष्ट्र’ स्पर्धेत ‘मिस’ प्रकारात ‘फर्स्ट रनर अप’चा (उपविजेती) बहुमान पटकावला आहे. रूपालीने मिळवलेल्या या यशामुळे जिल्ह्याचा गौरव फॅशन जगतात उंचावला आहे.
‘स्टार वॉक पूनम प्रॉडक्शन’च्या पूनम गोकुलपुरे यांच्या वतीने नागपूर येथील प्रसिद्ध ‘सातवचन बँक्वेट हॉल’ येथे १४ जून रोजी या भव्य सौंदर्य स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत नागपूर शहरासह संपूर्ण विदर्भातून जिल्हास्तरावरील उत्कृष्ट स्पर्धक सहभागी झाले होते. एकूण पाच वेगवेगळ्या विभागांतर्गत ही चुरस रंगली. यामध्ये आपल्या सौंदर्याची, आत्मविश्वासाची आणि बुद्धिमत्तेची चुणूक दाखवत रूपाली पारधीने विदर्भातील स्पर्धकांना मागे टाकत द्वितीय क्रमांक पटकावला.
देशातील नामांकित जुरींनी केले परीक्षण
या हाय-प्रोफाइल फॅशन शोमध्ये देशातील १६ नामांकित ड्रेस डिझायनर्सच्या डिझाईन्सचे रनवेवर सादरीकरण करण्यात आले. स्पर्धेचे मुख्य परीक्षक (जुरी) म्हणून छत्तीसगड येथील आलिया परवीन, दिल्लीचे गगनदीप सिंग, डॉ. रिचा जरिया आणि डायरेक्टर प्रदीप पाली यांनी काम पाहिले. तर स्पर्धकांना रॅम्प वॉक आणि ग्रुमिंगचे महत्त्वपूर्ण धडे आकाश मेघवानी, साक्षी बहल आणि अन्सारी सर यांनी दिले.
सेलिब्रिटींच्या उपस्थितीत शॉर्ट मुव्हीचे लाँचिंग
या दिमाखदार सोहळ्यात बिहारची प्रसिद्ध अभिनेत्री आयना सिंग प्रामुख्याने उपस्थित होती. तिच्याच हस्ते रूपाली पारधीला हा मानाचा पुरस्कार प्रदान करण्यात आला. पुरस्कार स्वीकारताना रूपालीने आयोजकांसह तिला पाठिंबा देणाऱ्या सर्वांचे आभार मानले.
या कार्यक्रमाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे पूनम प्रॉडक्शन आणि आलोक शर्मा यांच्या वतीने एका ‘शॉर्ट मुव्ही’चे लाँचिंग करण्यात आले. तसेच विविध क्षेत्रांतील २०० हून अधिक नामांकित मान्यवरांना ‘सेलिब्रिटी अवॉर्ड’ देऊन सन्मानित करण्यात आले. रूपालीच्या या यशामुळे गोरेगाव तालुक्यासह संपूर्ण गोंदिया जिल्ह्यातून तिच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.

Spread the News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *