LatestNewsगोंदिया- भंडाराविदर्भ

नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्प पर्यटनासाठी पूर्णपणे ‘लॉक’; विणीच्या हंगामामुळे तीन महिने दारे राहणार बंद

गोंदिया: रोजच्या धावपळीच्या आणि धकाधकीच्या जीवनातून काही वेळ काढून निसर्गाच्या सानिध्यात घालवण्यासाठी अत्यंत उपयुक्त आणि वन्यजीव प्रेमींचे हक्काचे ठिकाण असलेला जागतिक कीर्तीचा नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्प उद्या म्हणजेच मंगळवार, ३० जूनपासून पर्यटनासाठी पूर्णपणे बंद करण्यात येत आहे. पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर सुरक्षेच्या कारणास्तव आणि जंगलातील अंतर्गत व्यवस्थापनासाठी हा निर्णय घेण्यात आला असून, आता थेट १ ऑक्टोबर रोजी या प्रकल्पाचे मुख्य गेट पर्यटकांसाठी पुन्हा उघडले जाणार आहे. ऐन पावसाळ्याच्या तोंडावर पर्यटनावर बंदी लागणार असल्याने वन्यजीव प्रेमी आणि पर्यटकांचा मात्र मोठा हिरमोड होणार आहे.
जिल्ह्याला वरदान ठरलेल्या नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्पात विविध प्रकारच्या वन्यप्राण्यांसोबतच वाघोबाचे हमखास दर्शन होत असल्याने दरवर्षी येथे देश-विदेशातून मोठ्या संख्येने पर्यटक जंगल सफारीसाठी येत असतात. वास्तविक पाहता, दरवर्षी ७ जून रोजी मृग नक्षत्र लागत असल्याने आणि पावसाळ्याला सुरुवात होत असल्याने १५ जूनपासूनच हा व्याघ्र प्रकल्प पर्यटनासाठी बंद केला जातो. मात्र, यंदा जून महिना संपत आला तरी पावसाने दमदार हजेरी न लावल्यामुळे आणि हवामान कोरडे राहिल्याने प्रशासनाने पर्यटकांची मागणी लक्षात घेऊन पर्यटनाची मुदत ३० जूनपर्यंत वाढवून दिली होती. अखेर उद्या ३० जून रोजी ही वाढीव मुदत संपत असल्याने अधिकृतपणे प्रकल्प बंद केला जात आहे.
यंदाच्या उन्हाळी हंगामात म्हणजेच मार्च, एप्रिल आणि मे या तीन महिन्यांत नवेगाव-नागझिरामध्ये पर्यटकांचा अभूतपूर्व ओघ पाहायला मिळाला. अधिकृत आकडेवारीनुसार, या तीन महिन्यांत तब्बल ९,१३० पर्यटकांनी १,८२७ वाहनांच्या माध्यमातून जंगल सफारीचा आनंद घेतला. यामधून वनविभागाला २४ लाख २५ हजार ५६८ रुपयांचा विक्रमी महसूल प्राप्त झाला आहे. यामध्ये सर्वाधिक गर्दी मे महिन्यात झाली, जिथे कडक उन्हाची परवा न करता ५,२५१ पर्यटकांनी हजेरी लावली होती. मार्च महिन्यात २,०८५ पर्यटकांनी ५ लाख ८५ हजार, एप्रिलमध्ये १,७९४ पर्यटकांनी ४ लाख ९८ हजार तर मे महिन्यात विक्रमी १३ लाख ४१ हजार रुपयांचा महसूल शासनाच्या तिजोरीत जमा झाला आहे.
वनविभागाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पावसाळा हा जंगलातील वन्यप्राण्यांचा, विशेषतः वाघ आणि इतर प्राण्यांचा विणीचा (प्रजननाचा) हंगाम असतो. या काळात प्राण्यांच्या नैसर्गिक अधिवासात मानवी हस्तक्षेप टाळणे आवश्यक असते. तसेच, पावसाळ्यात जंगलातील अंतर्गत कच्चे रस्ते चिखलमय आणि निसरडे होत असल्याने पर्यटकांच्या वाहनांचा अपघात होण्याची शक्यता असते. यामुळेच दरवर्षी ही खबरदारी घेतली जाते. आता थेट १ ऑक्टोबर रोजी नवीन हंगाम सुरू होणार असून, तोपर्यंत पर्यटकांना पुढील तीन महिने वाट पाहावी लागणार आहे.

Spread the News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *