गोंदियात ७३ हजार वाहने अजूनही नंबरप्लेटविना!
एचएसआरपी नसलेल्या ४८९ वाहनांवर आरटीओचा दणका
केवळ २१ वाहनधारकांनी भरला दंड
जिल्ह्यातील ४० टक्के वाहनांवर जुन्याच पाट्या
गोंदिया : वाहनांवर उच्च सुरक्षा नोंदणी क्रमांक फलक (HSRP) बसविण्यासाठी वारंवार मुदतवाढ देऊनही वाहनधारकांकडून होत असलेल्या दुर्लक्षावर गोंदिया उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाने (RTO) आता थेट दंडात्मक कारवाईचा बडगा उगारला आहे. जुलै ते सप्टेंबर या तीन महिन्यांच्या कालावधीत आरटीओच्या वायुवेग पथकाने १ हजार ४८९ वाहनांची तपासणी करून एचएसआरपी नसलेल्या तब्बल ४८९ वाहनांवर कारवाई केली आहे. मात्र, कारवाई झालेल्यांपैकी आतापर्यंत केवळ २१ वाहनचालकांनी प्रत्येकी एक हजार रुपयांप्रमाणे २१ हजार रुपयांचा दंड भरला असून उर्वरित दंड वसुली बाकी आहे.
सविस्तर वृत्त असे की, १ एप्रिल २०१९ पूर्वी नोंदणी झालेल्या सर्व वाहनांना सुरक्षेच्या दृष्टीने हाय सिक्युरिटी नंबरप्लेट बसविणे शासनाने बंधनकारक केले आहे. परिवहन विभागाने वाहनधारकांना नंबरप्लेट बसविण्यासाठी तब्बल सहा वेळा मुदतवाढ दिली होती. अखेर ३० जून २०२६ ही अंतिम मुदत संपल्यानंतर परिवहन आयुक्तांच्या निर्देशानुसार १ जुलैपासून राज्यभरात विशेष तपासणी व दंडात्मक मोहीम सुरू करण्यात आली आहे.
जिल्ह्यातील ४० टक्के वाहने अद्याप विना एचएसआरपी
गोंदिया उपप्रादेशिक परिवहन कार्यालयांतर्गत एकूण १ लाख ७८ हजार वाहनांची नोंदणी आहे. त्यापैकी आतापर्यंत १ लाख ४ हजार २५० वाहनांवर (सुमारे ६० टक्के) एचएसआरपी बसविण्यात आली आहे. म्हणजेच जिल्ह्यातील तब्बल ७३ हजार ७५० वाहने अद्यापही जुन्याच नंबरप्लेटवर रस्त्यावर धावत आहेत. ही उदासीनता लक्षात घेता आरटीओने रस्त्यावर उतरून तपासणी अधिक कडक केली आहे.
काय आहे एचएसआरपीचे महत्त्व?
उच्च सुरक्षा नोंदणी क्रमांक फलक (एचएसआरपी) हा विशेष ॲल्युमिनियम धातूपासून तयार केला जातो. त्यावर लेझर तंत्रज्ञानाद्वारे कोरलेला कायमस्वरूपी विशिष्ट ओळख क्रमांक (युनिक कोड), अशोक चक्र असलेला क्रोमियम होलोग्राम आणि ‘इंडिया’ असे लिहिलेले असते. यामुळे वाहनांची चोरी, बनावट नंबरप्लेटचा वापर आणि गुन्हेगारी कृत्यांमध्ये होणारा वाहनांचा गैरवापर रोखण्यास मोठी मदत होते.
…….. प्रतिक्रिया……
“एचएसआरपी बसविण्यासाठी दिलेली अंतिम मुदत संपली आहे. त्यामुळे नंबरप्लेट नसलेल्या वाहनांची तपासणी करून नियमानुसार प्रत्येकी १ हजार रुपयांची दंडात्मक कारवाई सुरू करण्यात आली आहे. वाहनधारकांनी पुढील कायदेशीर कारवाई व भुर्दंड टाळण्यासाठी आपल्या वाहनांवर लवकरात लवकर उच्च सुरक्षा नंबरप्लेट बसवून घ्यावी. ही कारवाई यापुढेही अशीच सुरू राहणार आहे.”
— विकास चौधरी, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी (RTO), गोंदिया

