गुदमा ते प्रताप बाग रेल्वे लाईन भूसंपादन : मोबदला वाढवून द्या ‘किसान जमीन बचाओ संघर्ष समिती’ आक्रमक!
१८ ऑक्टोबरची मुदत वाढविण्याचा प्रस्ताव; उपविभागीय अधिकाऱ्यांना शेतकऱ्यांचे निवेदन
गोंदिया : गुदमा ते प्रताप बाग नवीन रेल्वे मार्गासाठी करण्यात येत असलेल्या जमीन संपादनात शेतकऱ्यांना अत्यंत तुटपुंजा मोबदला दिला जात असल्याचा आरोप करत ‘किसान जमीन बचाओ संघर्ष समिती’ने आक्रमक पवित्रा घेतला आहे. भूसंपादनाचा अंतिम निवाडा अनेक गंभीर त्रुटींनी भरलेला असून, भूमी अभिलेख विभागाकडून वाटप प्रक्रिया पूर्ण झालेली नसताना प्रशासनाने १८ ऑक्टोबर २०२६ ही मोबदला स्वीकारण्याची अंतिम तारीख निश्चित केल्याने शेतकऱ्यांमध्ये तीव्र असंतोष पसरला आहे. या पार्श्वभूमीवर समितीने सोमवारी, १२ ऑक्टोबर रोजी गोंदियाच्या उपविभागीय अधिकाऱ्यांना (एसडीओ) मागण्यांचे सविस्तर निवेदन सादर करून तीव्र आंदोलनाचा इशारा दिला.
या प्रश्नावर रणनीती ठरविण्यासाठी नुकतीच कटंगी कला (गोंदिया) येथील मयूर लॉनमध्ये बाधित शेतकरी व प्लॉटधारकांची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली होती. या बैठकीत भू-संपादन अधिकाऱ्यांनी दिलेली मोबदला स्वीकारण्याची मुदत पुढे ढकलणे आणि सदोष निवाड्यात तातडीने सुधारणा घडवून आणण्याबाबत सर्वानुमते ठराव संमत करण्यात आला होता. या ठरावानुसार शेकडो शेतकऱ्यांनी एकत्र येत प्रशासनाकडे दाद मागितली.
शेतकऱ्यांच्या प्रमुख मागण्या :
मुदतवाढ द्यावी : भू-संपादन अधिकाऱ्यांच्या सूचनेनुसार अनेक शेतकरी व भू-धारकांच्या जमिनी तसेच प्लॉटचे भूमी अभिलेख कार्यालयामार्फत अद्याप अधिकृत वाटप झालेले नाही. अशा स्थितीत अनेक शेतकरी मोबदल्यापासून वंचित राहण्याची शक्यता असल्याने १८ ऑक्टोबर २०२६ ही पूर्वघोषित तारीख पुढे ढकलण्यात यावी.
त्रुटीपूर्ण निवाडा दुरुस्त करा किंवा बदलावा : भूसंपादन अधिकाऱ्यांनी जाहीर केलेल्या अंतिम निवाड्यात झाडे, विहिरी, बांधकामे आणि प्रत्यक्ष जमिनीच्या क्षेत्रफळात अनेक गंभीर त्रुटी आहेत. त्यामुळे हा सदोष निवाडा तातडीने दुरुस्त करावा अथवा तो रद्द करून शेतकऱ्यांना विश्वासात घेऊन नवीन निवाडा प्रसिद्ध करावा.
बाजारभावानुसार वाढीव मोबदला : रेल्वे प्रकल्पासाठी संपादित केल्या जाणाऱ्या जमिनीचा मोबदला अत्यल्प असून तो सद्यस्थितीतील बाजारभावाप्रमाणे वाढवून द्यावा.
मागण्या मान्य न झाल्यास आंदोलनाचा इशारा
उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदन सादर करताना शेतकरी, प्लॉटधारक आणि बाधित दुकानदारांची मोठी उपस्थिती होती. प्रशासनाने या मागण्यांकडे दुर्लक्ष केल्यास रेल्वे लाईनचे काम रोखून तीव्र जनआंदोलन छेडले जाईल, असा इशारा उपस्थित शेतकऱ्यांनी दिला.
या वेळी संघटनेचे अध्यक्ष अखिलेश सेठ, सचिव अमित बुद्धे, कार्तिक चौहान, चुटे गुरुजी, राजेश नागरिकर, सुप्रीत बैंस, किशोर उपाध्याय, किशोर चौरसिया, अय्यूब शेख, जितेंद्र लिल्हारे, जीतू लिल्हारे, सूरज बावनकर, राधाकृष्ण ठाकूर, हेमंत नागपुरे, प्रीतलाल चिखलोंडे, मोतीराम लिल्हारे आणि सोहनलाल नागपुरे यांच्यासह परिसरातील शेकडो शेतकरी व बाधित नागरिक उपस्थित होते.

