दीक्षाभूमीवर अनुयायांची रेलचेल; नांदेड, जालना आणि नागपूरसाठी धावणार स्पेशल ट्रेन्स
अनुयायांच्या सुरक्षेसाठी १५ कोटी रुपयांचे विमा कवच
नागपूर: धम्मचक्र प्रवर्तन दिवसाच्या निमित्ताने दीक्षाभूमीवर येणाऱ्या लाखो अनुयायांच्या सुरक्षेसाठी सामाजिक न्याय विभातर्फे १५ कोटी रुपयांचे विमा कवच उपलब्ध करून देण्यात आले आहे. भारतीय जीवन विमा निगम (एलआयसी) च्या माध्यमातून करण्यात आलेल्या या व्यवस्थेअंतर्गत कोणत्याही अनुचित घटनेसाठी १० कोटी रुपये, तर आग लागण्याच्या घटनांसाठी स्वतंत्रपणे ५ कोटी रुपयांचे विमा संरक्षण देण्यात आले आहे. विशेष म्हणजे, या वर्षी प्रथमच दीक्षाभूमीवर उभारण्यात आलेल्या निवास केंद्रांनाही विमा सुरक्षेच्या कक्षेत आणण्यात आले आहे.
धम्मचक्र प्रवर्तन दिवसाच्या सोहळ्यात सहभागी होण्यासाठी देशभरातून लाखो अनुयायी नागपूरमध्ये दाखल होतात. या अनुयायांच्या राहण्याची समस्या दूर करण्यासाठी प्रशासनाकडून दीक्षाभूमीच्या इतिहासात प्रथमच २१ निवास केंद्रांसाठी २२ डोम्स तयार करण्यात आले आहेत. संभाव्य दुर्घटनांपासून सुरक्षेचा उपाय म्हणून या व्यवस्थांसह विमा कवचही प्रदान करण्यात आले असल्याची माहिती समाज कल्याण, नागपूरच्या साहाय्यक आयुक्त तथा सदस्य सचिव सुकेशिनी तेलगोटे यांनी दिली. प्रत्येक निवास केंद्रात किमान १ हजार अनुयायांच्या राहण्याची सोय करण्यात आली असून, या केंद्रांमध्ये वातानुकूलित यंत्रणा, कुलर, आरओ द्वारे शुद्ध पिण्याचे पाणी, शौचालय आणि मोठ्या एलईडी स्क्रीनसारख्या सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. यामुळे अनुयायी मुख्य सोहळा थेट पाहू शकतील. तसेच भिक्षूंच्या राहण्यासाठी वेगळी व्यवस्थाही करण्यात आली असून, देशभरातून येणाऱ्या अनुयायांना त्रास होऊ नये यादरशी निवासाची चोख व्यवस्था करण्यात आली आहे.
नांदेड, जालना आणि नागपूरसाठी विशेष रेल्वे गाड्या:
धम्मचक्र प्रवर्तन दिवसादरम्यान नागपूरमध्ये येणाऱ्या श्रद्धाळूंची संभाव्य गर्दी लक्षात घेऊन दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड मंडलातर्फे ४ फेऱ्यांच्या विशेष ट्रेन चालवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यामुळे प्रवाशांना अतिरिक्त सुविधा मिळणार असून, या गाड्यांचे तपशील पुढीलप्रमाणे आहेत:
नांदेड-नागपूर विशेष ट्रेन (गाडी क्र. ०७०८५): ही ट्रेन १९ ऑक्टोबर रोजी रात्री ८ वाजता नांदेडहून सुटून मंगळवारी सकाळी १०:२५ वाजता नागपूरला पोहोचेल. परतीच्या प्रवासात गाडी क्र. ०७०८६ मंगळवारी रात्री ११:५५ वाजता नागपूरहून निघून बुधवारी सकाळी ९ वाजता नांदेडला पोहचेल. मुदखेड, भोकर, हिमायतनगर, किनवट, आदिलाबाद आणि पिंपळखुटी येथे या ट्रेनचा थांबा असून, यात ६ जनरल, ८ एसी आणि २ गार्ड-सह-पार्सल कोचसह एकूण १६ कोच असतील.
जालना-नागपूर विशेष ट्रेन (गाडी क्र. ०७०८३): ही ट्रेन १९ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ५ वाजता जालन्याहून सुटून मंगळवारी दुपारी १२:१० वाजता नागपूर येथे पोहोचेल. परतीसाठी गाडी क्र. ०७०८४ २१ ऑक्टोबर रोजी रात्री १ वाजता नागपूरहून निघून सकाळी ११:०२ वाजता जालना गाठेल. परतूर, सेलू, मानवत रोड, परभणी, हिंगोली, वाशिम आणि अकोला येथे या ट्रेनचा थांबा असणार असून, यात ८ जनरल, ९ एसी क्लास आणि २ गार्ड-सह-सामान यान मिळून एकूण १९ कोच राहतील.

