LatestNewsगोंदियाविदर्भ

गोंदियातील रेल्वे उड्डाणपुलाच्या बांधकामाला वेग; इंदूरमध्ये तयार होताहेत रेल्वेमार्गावरील गर्डर!

आमदार विनोद अग्रवाल यांनी प्रत्यक्ष केली पाहणी : डिसेंबरअखेर दोन्ही बाजूंचे काम पूर्ण करण्याचे निर्देश
गोंदिया :
गोंदिया शहराच्या दोन महत्त्वाच्या भागांना जोडणाऱ्या आणि वाहतुकीची जीवनवाहिनी मानल्या जाणाऱ्या बहुप्रतिक्षित नवीन छोट्या रेल्वे उड्डाणपुलाच्या (Railway Overbridge) बांधकामाने आता चांगलाच वेग घेतला आहे. आमदार विनोद अग्रवाल यांनी प्रत्यक्ष घटनास्थळी भेट देऊन सुरू असलेल्या बांधकामाची पाहणी केली. या पुलाचे काम निर्धारित वेळेत पूर्ण व्हावे यासाठी त्यांनी कंत्राटदार एजन्सी व सार्वजनिक बांधकाम विभागाला कामाचा वेग वाढवून डिसेंबरअखेर दोन्ही बाजूंचे उर्वरित बांधकाम तातडीने आटोपण्याचे कडक निर्देश दिले.
शहरातील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या या पुलाच्या कामात सुरुवातीला होत असलेल्या दिरंगाईबद्दल आमदार विनोद अग्रवाल यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली होती. त्यांनी नुकतीच शासकीय विश्रामगृहात सार्वजनिक बांधकाम विभाग नागपूरचे मुख्य अभियंता संभाजी माने, अधीक्षक अभियंता नीता ठाकरे, कार्यकारी अभियंता रामटेके तसेच बांधकाम एजन्सीचे प्रतिनिधी नागराल यांच्यासोबत तातडीची आढावा बैठक घेतली होती. या बैठकीत कामातील सर्व अडथळे दूर करत फेब्रुवारीअखेर पूल पूर्ण करून वाहतुकीसाठी खुला करण्याचे स्पष्ट निर्देश दिले होते. या दणक्यानंतर आता प्रत्यक्ष कामाला मोठी गती मिळाली आहे.
डिसेंबरअखेर दोन्ही बाजूंचे काम पूर्ण करण्याचे उद्दिष्ट
सध्या रेल्वे रुळांवरील मधला भाग वगळता पुलाच्या दोन्ही बाजूंचे बांधकाम युद्धपातळीवर सुरू आहे. पुलासोबतच परिसरातील पाण्याचा निचरा सुरळीत व्हावा यासाठी पावसाळ्यातील जलभरावाच्या समस्येवर मात करण्यासाठी भूमिगत नाल्यांचे बांधकाम केले जात आहे. तसेच, पुलाच्या दोन्ही बाजूंना जयस्तंभ चौकापर्यंत मजबूत सिमेंट काँक्रीट रस्त्यांची निर्मिती केली जाणार आहे. याशिवाय जयस्तंभ चौकाचे सुशोभीकरणही प्रस्तावित असून, यामुळे केवळ वाहतूक सुरळीत होणार नाही तर शहराच्या वैभवातही भर पडणार आहे. डिसेंबरअखेरपर्यंत पिलर, गर्डर, स्लॅब, संरक्षक भिंती (रिटेनिंग वॉल) आणि सर्व्हिस रोडचे काम १०० टक्के पूर्ण करण्याचे नियोजन करण्यात आले आहे.
इंदूरमध्ये तयार होताहेत गर्डर; जानेवारीत मेगा ब्लॉक
रेल्वे ट्रॅकच्या वरील भागासाठी लागणारे विशेष लोखंडी गर्डर इंदूर (मध्य प्रदेश) येथे वेगाने तयार केले जात आहेत. प्रस्तावित नियोजनानुसार, जानेवारी महिन्यात रेल्वे विभागाकडून रीतसर ‘मेगा ब्लॉक’ घेऊन हे गर्डर ट्रॅकवर यशस्वीपणे बसविले जाणार आहेत. त्यानंतर अंतिम टप्प्यातील डांबरीकरण व इतर तांत्रिक बाबी पूर्ण करून फेब्रुवारीअखेर हा उड्डाणपूल गोंदियाकरांच्या सेवेत दाखल करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. छोटा उड्डाणपूल पूर्ण क्षमतेने सुरू झाल्यानंतर शहरातील दोन्ही भागांमधील अंतर कमी होऊन वाहतूक कोंडीची वर्षानुवर्षांची डोकेदुखी कायमची मिटणार आहे. आमदार विनोद अग्रवाल यांच्या सततच्या पाठपुराव्यामुळे प्रकल्पातील अडथळे दूर झाले असून आता शहरवासीयांचे डोळे हा पूल लवकर खुला होण्याकडे लागले आहेत.

Spread the News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *