रेलटोलीतील ‘टॉम्स कॅफे’वर पोलिसांचा छापा; अवैध हुक्का पार्लरचा पर्दाफाश, ३७ हजारांचा मुद्देमाल जप्त!
रामनगर पोलिसांची मध्यरात्री धडक कारवाई : प्रतिबंधित तंबाखूजन्य फ्लेवर्ससह हुक्का साहित्य हस्तगत; तिघांविरुद्ध गुन्हा दाखल
गोंदिया : शहरातील रेलटोली परिसरात कॅफेच्या नावाखाली छुप्या पद्धतीने चालविल्या जाणाऱ्या अवैध हुक्का पार्लरवर रामनगर पोलिसांनी मध्यरात्री छापा टाकून मोठा पर्दाफाश केला. या कारवाईत पोलिसांनी प्रतिबंधित तंबाखूजन्य फ्लेवर्स, हुक्का पॉट्स व इतर साहित्यासह ३७ हजार ४२५ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणी कॅफे चालविणाऱ्या तिघांविरुद्ध रामनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विनोद ओंकार भांडारकर (वय ३६, रा. वाजपेयी वार्ड, गोंदिया), यश नरेश गोलानी (वय २६, रा. आशीर्वाद कॉलनी, गोंदिया) आणि आकाश उर्फ आशु सूरज चौरसिया (वय २६, रा. गोशाळा वार्ड, गोंदिया) अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत.
कॅफेच्या आडून तरुणाईला नशेच्या विळख्यात ओढण्याचा प्रयत्न
सविस्तर वृत्त असे की, रेलटोली परिसरातील ‘टॉम्स कॅफे’मध्ये कोणत्याही शासकीय परवान्याशिवाय हुक्का पार्लर चालवून येणाऱ्या ग्राहकांना प्रतिबंधित तंबाखूयुक्त विविध फ्लेवर्स उपलब्ध करून दिले जात असल्याची खात्रीशीर गोपनीय माहिती रामनगर पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक भाऊराव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील पथकाने बुधवार, १४ ऑक्टोबर रोजी मध्यरात्री सुमारे १२.३० वाजताच्या सुमारास टॉम्स कॅफेवर अचानक छापा टाकला.
मोठ्या प्रमाणावर हुक्का साहित्य जप्त
पोलिसांनी केलेल्या झडतीदरम्यान कॅफेमध्ये विविध फ्लेवर्सचे सीलबंद तंबाखूजन्य पॅकेट्स, हुक्का पिण्याचे प्लास्टिक पाईप्स, शीशा फ्लेवर चारकोल, मॅजिक रोल फॉइलसह एकूण २७ काचेचे हुक्का पॉट, दोन पाईपयुक्त काचेचे हुक्का पॉट, २७ हुक्का पाईप, मल्टीपर्पज पाईप, मातीची चिलम, कोळसा ठेवण्याच्या स्टील प्लेट्स, कोळशाची जाळी, हुक्का स्टील वॉल, लोखंडी शेगडी, बर्नर, रबर वायशर आणि ग्राइंडर मशीन असा एकूण ३७ हजार ४२५ रुपये किमतीचा मुद्देमाल मिळून आला. पोलिसांनी हा सर्व साठा जागीच जप्त केला.
तिघांविरुद्ध गुन्हा नोंद
या प्रकरणी सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक ठाकरे यांच्या तक्रारीवरून तिन्ही आरोपींविरुद्ध सिगारेट व इतर तंबाखू उत्पादने (प्रतिबंध आणि व्यापार, वाणिज्य, उत्पादन, पुरवठा आणि वितरण यांचे विनियमन) अधिनियम (COTPA) अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक संजय नागरगोजे करत आहेत. शहरात अवैध धंदे करणाऱ्यांवर पोलिसांची करडी नजर असून अशा कारवाया यापुढेही सुरूच राहतील, असा इशारा पोलिसांनी दिला आहे.

