LatestNewsगोंदिया- भंडाराविदर्भ

गोसीखुर्द धरण लबालब; पूर्व विदर्भातील ४ जिल्ह्यांना मोठा दिलासा

पाण्याची पातळी अंतिम क्षमतेनुसार २४५.५० मीटरवर
भंडारा :
अल निनोच्या प्रभावामुळे या वर्षी सरासरीपेक्षा सुमारे २५ टक्के कमी पाऊस झाल्याने राज्यात दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. अशा स्थितीत जून २०२७ मध्ये पुढील पाऊस येईपर्यंत पिण्याचे पाणी, शेती आणि गुरांच्या पाण्याचा योग्य नियोजनाची गरज भासत आहे. या पार्श्वभूमीवर पूर्व विदर्भाची जीवनरेखा मानल्या जाणाऱ्या गोसीखुर्द धरणाची पाण्याची पातळी मंगळवारी आपल्या अंतिम क्षमतेनुसार २४५.५० मीटरवर पोहोचली आहे. यामुळे भंडारा, नागपूर, चंद्रपूर आणि गडचिरोली या जिल्ह्यांच्या आगामी पाणी नियोजनाला मोठा दिलासा मिळण्याची आशा आहे. सध्या हे धरण पर्यटकांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरत आहे.
प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, पाणीपातळी टिकवून ठेवण्यासाठी धरणाचे सर्व ३३ वक्र दरवाजे (क्रेस्ट गेट) बंद ठेवण्यात आले होते, ज्यामुळे पाणी हळूहळू २४५.५० मीटरच्या अंतिम मर्यादेपर्यंत पोहोचले. मात्र, धरण पूर्ण भरल्याने आसपासच्या काही गावांच्या वेशीपर्यंत बॅकवॉटर पोहोचले आहे. वर्ष २०२२ मध्येही धरण पूर्ण क्षमतेने भरले असताना वैनगंगा खोऱ्यातील काही भाग, भंडारा शहराला लागून असलेल्या वस्त्या आणि स्मशानभूमी पाण्याखाली गेली होती. हा अनुभव लक्षात घेऊन यंदा टप्प्याटप्प्याने पाण्याचा विसर्ग करण्याची योजना आखली जात आहे.
आपत्ती व्यवस्थापन अधिकारी अभिषेक नामदास यांनी सांगितले की, धरणाची अंतिम पातळी गाठल्यानंतर जलसंपदा विभाग आणि गोसीखुर्द प्रकल्पाच्या अधिकाऱ्यांसोबत समीक्षा बैठक घेतली जाईल. यात आपत्ती व्यवस्थापन, सिंचन आणि पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करणाऱ्या विभागांमध्ये समन्वयावर भर दिला जाईल. संभाव्य पुराचा धोका टाळण्यासाठी गरजेनुसार पाणी सोडले जाईल, तर धरणाची पातळी २४५.५० मीटरवर कायम ठेवण्याचे नियोजन आहे. धरण पूर्ण भरल्यामुळे चार जिल्ह्यांसाठी पाण्याची उपलब्धता वाढली असली, तरी येत्या महिन्यात प्राधान्यक्रमानुसार पाण्याचा वापर करणे हे प्रशासनासमोर मोठे आव्हान असणार आहे. पिण्याच्या पाण्याला प्राधान्य देत शेती, पशुधन आणि पूर नियंत्रण या सर्वांमध्ये संतुलन राखावे लागणार आहे.
दरम्यान, भंडारा जिल्ह्यात एवढा मोठा जलाशय असूनही जिल्ह्यातील अनेक भागांना याचा पुरेसा लाभ मिळत नसल्याने नाराजी व्यक्त होत आहे. या दुष्काळसदृश परिस्थितीत आता साकोली आणि लाखनी तालुक्यातील शेतकऱ्यांनाही गोसीखुर्द धरणाचे पाणी उपलब्ध करून देण्याची मागणी जोर धरू लागली आहे. शेजारील जिल्ह्यांना धरणातून पाणी पुरवले जात असताना स्थानिक शेतकऱ्यांना सिंचनासाठी पुरेसे पाणी मिळत नसल्याने शेतकरी वर्ग आक्रमक झाला असून त्यांना धरणाचे पाणी देण्याची मागणी केली जात आहे.

Spread the News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *