LatestNewsगोंदिया- भंडाराविदर्भ

पुण्यात रंगलेल्या २१ व्या राज्य पोलीस कर्तव्य मेळाव्यात गडचिरोली ‘BDDS’ पथकाची बाजी!

घातपात विरोधी तपासणी स्पर्धेत दोन कांस्यपदके पटकावली गडचिरोली परिक्षेत्र राज्यात तृतीय
गडचिरोली :
पोलीस दलातील व्यावसायिक नैपुण्य, तपासातील अचूकता आणि कौशल्यवृद्धीसाठी राज्य गुन्हे अन्वेषण विभागातर्फे (CID) पुणे येथे आयोजित २१ व्या राज्यस्तरीय ‘महाराष्ट्र राज्य पोलीस कर्तव्य मेळाव्यात’ गडचिरोली पोलीस दलाच्या बॉम्ब शोधक व नाशक पथकाने (BDDS) उल्लेखनीय कामगिरी करत दोन कांस्यपदके पटकावली आहेत. घातपात विरोधी तपासणी (Anti-Sabotage Check) स्पर्धेत गडचिरोली परिक्षेत्राने संपूर्ण राज्यात तृतीय क्रमांक पटकावून आता थेट ‘अखिल भारतीय पोलीस कर्तव्य मेळाव्या’त (National Police Duty Meet) धडक मारली आहे.
पुणे येथे ५ ते १० ऑक्टोबर २०२६ दरम्यान हा राज्यस्तरीय मेळावा पार पडला. यामध्ये राज्यातील विविध पोलीस आयुक्तालये, जिल्हा पोलीस दले व विशेष शाखा अशा तब्बल २६ विविध विभागांच्या संघांनी सहभाग घेतला होता. या मेळाव्यात वैज्ञानिक तपास पद्धती (सायंटिफिक एड टू इन्व्हेस्टिगेशन), पोलीस फोटोग्राफी, व्हिडीओग्राफी, संगणक साक्षरता, घातपात विरोधी तपासणी आणि श्वान पथक अशा विविध स्पर्धांमध्ये लेखी, तोंडी तसेच अत्यंत आव्हानात्मक प्रात्यक्षिक परीक्षांचे आयोजन करण्यात आले होते. तज्ज्ञ परीक्षकांकडून या चाचण्यांचे काटेकोर मूल्यांकन करण्यात आले.
‘ग्राउंड सर्च’ व ‘रुम सर्च’ प्रकारात दुहेरी कांस्य
नक्षलग्रस्त भागात अत्यंत कठीण व संवेदनशील परिस्थितीत बॉम्ब शोधक व नाशक कारवायांचा दांडगा अनुभव असलेल्या गडचिरोली पोलीस दलाच्या बीडीडीएस पथकातील पोलीस हवालदार पंकज हुलके व पोलीस अंमलदार धम्मदिप मेश्राम यांनी घातपात विरोधी तपासणी स्पर्धेत सहभाग घेतला होता. त्यांनी दाखवलेली अचूकता, सतर्कता आणि तांत्रिक कौशल्याच्या बळावर या स्पर्धेतील ‘ग्राउंड सर्च’ (उघड्या मैदानातील शोध मोहीम) आणि ‘रुम सर्च’ (बंद खोलीतील तपासणी) या दोन्ही प्रकारांत प्रत्येकी एक अशी दोन कांस्यपदके (Bronze Medals) पटकावली.
राष्ट्रीय स्तरावर महाराष्ट्राचे करणार प्रतिनिधित्व
सहा दिवस चाललेल्या चुरशीच्या स्पर्धांमधील एकत्रित गुणांच्या आधारे गडचिरोली परिक्षेत्राने घातपात विरोधी तपासणीत राज्यात तिसरा क्रमांक पटकावला. या घवघवीत यशामुळे आता गडचिरोली पोलीस दलाच्या या दोन्ही जवानांची ‘अखिल भारतीय पोलीस कर्तव्य मेळाव्या’साठी निवड झाली असून, ते राष्ट्रीय पातळीवर महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणार आहेत.
गडचिरोलीच्या संवेदनशील पट्ट्यात कर्तव्य बजावणाऱ्या पथकाने राज्यस्तरावर मारलेल्या या मुसंडीबद्दल पोलीस अधीक्षक एम. रमेश यांनी हवालदार पंकज हुलके आणि अंमलदार धम्मदिप मेश्राम यांचे पुष्पगुच्छ देऊन विशेष कौतुक केले असून, राष्ट्रीय स्पर्धेतही चमकदार कामगिरी करण्यासाठी त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.

Spread the News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *