ट्रेन्स-विमान फुल्ल, मुंबई-पुण्याहून नागपूर येणाऱ्या गाड्यांमध्ये तिकिटे संपली
दिवाळी पर्वात घरी येणे झाले कठीण : प्रवाशाची दमछाक
नागपूर: दिवाळीचा सण कुटुंबासोबत साजरा करण्यासाठी घरी परतण्याची तयारी करत असलेल्या नागपूरच्या विद्यार्थी आणि आयटी प्रोफेशनल्सच्या अडचणी वाढल्या आहेत. मुंबई आणि पुणे येथे राहणाऱ्या नागपूरच्या लोकांसाठी सणापूर्वी घरी पोहोचणे सोपे राहिलेले नाही. आगामी ४ ते ७ नोव्हेंबरदरम्यान मुंबई आणि पुण्यातून नागपूरकडे येणाऱ्या प्रमुख गाड्यांमध्ये तिकीट बुकिंग ‘रिग्रेट’ झाले आहे. तीच परिस्थिती दिवाळीनंतरच्या आठवड्यात नागपूरहून मुंबई-पुण्याकडे जाणाऱ्या ट्रेन्सचीसुद्धा आहे. त्यामुळे प्रवाशांना आता विशेष रेल्वे गाड्यांच्या घोषणेची प्रतीक्षा करावी लागत आहे.
मुंबई-नागपूर-मुंबई दरम्यान धावणाऱ्या दुरंतो एक्सप्रेससह इतर प्रमुख गाड्यांमध्ये तिकीट मिळण्याची शक्यता संपली असून सर्व गाड्यांमध्ये बुकिंग ‘रिग्रेट’ दाखवत आहे. तथापि, प्रत्यक्ष दिवाळीच्या दिवशी मुंबईवरून नागपूरला येणाऱ्या काही गाड्यांमध्ये वेटिंग उपलब्ध आहे, मात्र हा आकडा १०० च्या पार पोहोचला आहे. पुण्यातून येणाऱ्या सर्व गाड्यांच्या एसी आणि स्लीपर क्लासचीही हीच बिकट स्थिती आहे.
वंदे भारतमध्येही तिकिटांचा अभाव:
नागपूर-पुणे दरम्यान चांगल्या रेल्वे कनेक्टिव्हिटीसाठी सुरू करण्यात आलेल्या वंदे भारत एक्सप्रेसमध्ये सामान्य दिवसांत सहज तिकीट मिळते. परंतु, दिवाळीच्या काळात यामध्येही तिकिटे उपलब्ध नाहीत. एक्झिक्युटिव्ह चेअर कारचे भाडे ३,७४० रुपये असतानाही सर्व तिकिटे बुक झाली आहेत. विमानताराचे वाढलेले भाडे पाहता प्रवासी वंदे भारतला प्राधान्य देत आहेत.
विमानांचे वाढलेले भाडे (१९ हजारांपर्यंत):
रेल्वेमध्ये तिकीट मिळत नसल्याने प्रवासी हवाई प्रवासाचा पर्याय शोधत असून वाढलेल्या मागणीमुळे विमान कंपन्यांनीही भाडे वाढवले आहे. दिवाळीपूर्वी पुण्यातून नागपूरचे विमान भाडे १७,६९७ रुपयांपर्यंत पोहोचले आहे, तर मुंबई ते नागपूरचे भाडे १९,०२८ रुपयांपर्यंत गेले आहे. दिवाळीनंतरच्या आठवड्याच्या शेवटीही दोन्ही शहरांमधून नागपूरकडे येणाऱ्या उड्डाणांचे भाडे सामान्य दरापेक्षा दुप्पट पेक्षा जास्त आहे.
विशेष गाड्यांची मागणी:
प्रवाशांची होणारी गैरसोय लक्षात घेता मध्य रेल्वेच्या नागपूर मंडळाने भारतीय रेल्वेकडे सणादरम्यान विशेष गाड्या चालवण्याची मागणी केली आहे. नागपूर ते पुणे, मुंबई आणि बिहारच्या समस्तीपूरसाठी दोन ते तीन फेऱ्या चालवण्याचा प्रस्ताव पाठवण्यात आला आहे. आगामी काही दिवसांत या गाड्यांची घोषणा होणे अपेक्षित असून यामुळे सणासाठी घरी येणाऱ्या प्रवाशांना मोठा दिलासा मिळेल, अशी माहिती वरिष्ठ मंडळ वाणिज्य प्रबंधक अमन मित्तल यांनी दिली आहे.

