LatestNewsमहाराष्ट्रविदर्भ

वेळेवर एसटी बस मिळत नसल्याने १ सप्टेंबर रोजी विद्यार्थिनींचा संयम सुटला

चामोर्शी बस स्थानकावर संतप्त विद्यार्थिनींचे ‘चक्काजाम’ आंदोलन; एसटी प्रशासनाविरुद्ध पुकारला एल्गार
चामोर्शी (गढ़चिरौली) : ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना वेळेवर एसटी बस मिळत नसल्याने १ सप्टेंबर रोजी विद्यार्थिनींच्या संयमाचा बांध फुटला. चामोर्शी बस स्थानकावर संतप्त विद्यार्थिनींनी थेट ‘चक्काजाम’ आंदोलन करत एसटी प्रशासनाविरुद्ध एल्गार पुकारला. दुपारपासून उपाशीपोटी ताटकळत बसलेल्या ‘सावित्रीच्या लेकींनी’ रस्ता अडवून धरल्याने काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
तालुक्यातील आमगाव महाल, गणपूर, जयरामपूर, लखमापूर बोरी, कळमगाव, सागाणापूर, हळदी, रामनगर, वागदरा आणि भेंडाळा यांसारख्या ग्रामीण भागातून हजारो विद्यार्थी-विद्यार्थिनी दररोज चामोर्शी येथील शाळा व महाविद्यालयांत शिक्षणासाठी येतात. शासनाच्या मानव विकास योजनेअंतर्गत या विद्यार्थिनींसाठी विशेष बस सेवा उपलब्ध करून देण्यात आली आहे. मात्र, गेल्या काही दिवसांपासून या बसेस वेळेवर धावत नसल्याने विद्यार्थ्यांचे प्रचंड हाल होत आहेत. दुपारी १२:३० वाजता सुटणारी चामोर्शी-गणपूर-जयरामपूर बस आलीच नाही. त्यामुळे रणरणत्या उन्हात आणि उपाशीपोटी बस स्थानकावर ताटकळत राहावे लागले.
वाहतूक नियंत्रक, पोलीस निरीक्षकांची मध्यस्थी
घटनेची माहिती मिळताच एसटी महामंडळाचे वाहतूक नियंत्रक कोवे आणि चामोर्शीचे पोलीस निरीक्षक महादेव ढाकणे घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी आंदोलक विद्यार्थिनींशी चर्चा करून त्यांची समजूत काढली आणि तात्काळ पर्यायी बसची व्यवस्था करून ती मार्गस्थ केली.
नियमित बस सेवा हवी
“आम्हाला दररोज अशाच त्रासाला सामोरे जावे लागते. बस वेळेवर न आल्यामुळे आमचे शैक्षणिक नुकसान होत आहे. यापुढे अशी वेळ येऊ नये आणि नियमित बस सेवा सुरू राहावी,” अशी ठाम भूमिका आंदोलक विद्यार्थिनींनी मांडली. सततच्या त्रासाला वैतागून विद्यार्थ्यांनी केलेले हे आंदोलन शहरासह तालुक्यात चर्चेचा विषय ठरले होते.

Spread the News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *