गोरेगाव बसस्थानकाजवळ एसटी बसचे स्टेअरिंग अचानक झाले फेल
चालकाच्या प्रसंगावधानाने मोठा अनर्थ टळला!
नागपूर-गोंदिया मार्गावरील थरारक घटना; प्रवाशांनी भरलेली बस सुदैवाने नियंत्रणात, सर्व प्रवासी सुखरूप
गोरेगाव (गोंदिया): नागपूरहून गोंदियाच्या दिशेने जाणाऱ्या महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) धावत्या बसचे गोरेगाव बसस्थानकाजवळ पोहोचताच अचानक स्टेअरिंग फेल झाल्याची धक्कादायक घटना घडली. रविवार, १३ सप्टेंबर रोजी रात्री ९ वाजेच्या सुमारास हा थरार घडला. बसमध्ये मोठ्या संख्येने प्रवासी प्रवास करत असतानाच ही तांत्रिक बिघाडाची घटना घडली. मात्र, प्रसंगावधान राखून चालकाने दाखवलेल्या कौशल्यामुळे भरधाव बस रस्त्याच्या कडेला थांबवण्यात यश आले आणि सुदैवाने मोठा अनर्थ टळला.

मिळालेल्या माहितीनुसार, नागपूर आगारातून प्रवाशांना घेऊन निघालेली एसटी बस (क्रमांक एमएच ०९ ईएम १८७०) रात्रीच्या सुमारास गोरेगाव बसस्थानकात प्रवेश करण्याच्या बेतात होती. स्थानकाजवळ येताच बसचे स्टेअरिंग अचानक पूर्णपणे जाम झाले. हा प्रकार तत्काळ चालकाच्या लक्षात आला. कोणतीही भीती न बाळगता चालकाने तात्काळ नियंत्रण मिळवण्याचा शर्थीचा प्रयत्न केला. सुदैवाने वळणावर बसचा वेग नियंत्रित असल्याने बस सुरक्षितरीत्या रस्त्याच्या कडेला थांबली, ज्यामुळे मोठी जीवितहानी टळली आणि आतील सर्व प्रवासी सुरक्षित राहिले. या घटनेमुळे प्रवाशांचा काही काळ थरकाप उडाला. भररात्री बस नादुरुस्त झाल्यामुळे प्रवाशांना तब्बल एक तास गोरेगाव बसस्थानकावरच ताटकळत राहावे लागले. अखेर महामंडळाने तत्परता दाखवत दुसऱ्या बसची सोय केली आणि प्रवाशांना पुढील प्रवासासाठी गोंदियाकडे रवाना केले.जुन्या अन् खिळखिळ्या बसेसच्या देखभालीकडे दुर्लक्ष का?एसटी महामंडळाच्या ताफ्यातील अनेक जुन्या बसेस नियमित देखभालीअभावी खिळखिळ्या झाल्याचे चित्र वारंवार समोर येत आहे. धावत्या वाहनांचे स्टेअरिंग फेल होणे, ब्रेक निकामी होणे किंवा चाके निखळणे यांसारखे प्रकार प्रवाशांच्या जीवावर बेतत आहेत. गोरेगाव येथील घटनेत चालकाच्या सतर्कतेने घात टळला असला, तरी महामंडळाने प्रवाशांच्या सुरक्षेसाठी सर्व बसेसचे तातडीने तांत्रिक व सुरक्षा ऑडिट करावे, अशी आग्रही मागणी प्रवाशांकडून केली जात आहे.

