जिल्हा वार्षिक योजनेचे प्रस्ताव वेळेच्या आत सादर करा – जिल्हाधिकारी प्रजित नायर
जिल्हा वार्षिक योजना आढावा बैठक
गोंदिया : जिल्ह्याच्या सर्वांगिण विकासासाठी जिल्हा नियोजन समितीकडून प्रत्येक विभागाला निधी वितरीत करण्यात येतो. शासनाच्या मार्गदर्शक सूचनानुसार जिल्हा वार्षिक योजनेचे प्रस्ताव वेळेच्या आत सादर करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी प्रजित नायर यांनी आज दिले. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात आज (ता.30) जिल्हा वार्षिक योजना सन 2025-26 अंतर्गत आढावा बैठक घेण्यात आली, त्यावेळी ते बोलत होते. सभेला निवासी उपजिल्हाधिकारी भैय्यासाहेब बेहेरे, जिल्हा नियोजन अधिकारी सुनिल धोंगडे, प्रकल्प अधिकारी उमेश काशिद, अधिष्ठाता डॉ.कुसुमाकर घोरपडे यांचेसह विविध विभागाचे कार्यालय प्रमुख उपस्थित होते.जिल्हाधिकारी श्री. नायर म्हणाले, सर्व अंमलबजावणी यंत्रणांनी आजच्या प्रचलित शासन निर्णयानुसार जिल्हा वार्षिक योजनांचे प्रस्ताव त्वरित सादर करावे. प्रस्ताव सादर करतांना सर्व अटी व शर्तीचा विचार करुनच प्रस्ताव सादर करावा. प्रस्ताव आज (30 सप्टेबर) सायंकाळपर्यंत सादर झाले पाहिजे, असे निर्देश त्यांनी सर्व अंमलबजावणी यंत्रणांना दिले. यावेळी विभागनिहाय योजनेअंतर्गत प्राप्त झालेल्या प्रस्तावांचा, तसेच अप्राप्त प्रस्तावाबाबत विचारणा केली. अप्राप्त प्रस्ताव आजच पाठविण्याच्या सूचना त्यांनी संबंधितांना दिल्या. खरेदीच्या योजनांचे 10 % खर्चाच्या मर्यादेतच प्रस्ताव पाठविण्याच्या सूचना त्यांनी यावेळी केल्या. अनावश्यक खरेदीला मान्यता मिळणार नाही असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. नाविण्यपूर्ण योजनेअंतर्गत प्रस्तावाला शासनाच्या मार्गदर्शक सूचनानुसारच मंजुरी दिली जाईल असे त्यांनी सूचित केले. पुनर्विनियोजन योजनांचे प्रस्ताव 10 % खर्चाच्या मर्यादेतच करावयाचे आहे असे त्यांनी यावेळी सांगितले.

