LatestNewsगोंदिया- भंडारामहाराष्ट्रराष्ट्रीय

विदर्भातील निष्ठावान नेते राजेंद्र जैन यांचे दिग्गज नेत्यांच्या उपस्थितीत उमेदवारी अर्ज दाखल

गोंदिया/मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने राज्यसभेसाठी गोंदियाचे सुपुत्र आणि माजी आमदार राजेंद्र जैन यांनी आज आपला उमेदवारी अर्ज अधिकृतरीत्या दाखल केला. आगामी राजकीय समीकरणे आणि विदर्भातील पक्षाची संघटनात्मक बांधणी अधिक मजबूत करण्याच्या उद्देशाने पक्षाने एका अनुभवी आणि विश्वासू चेहऱ्याला दिल्लीच्या सभागृहात पाठवण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. अर्ज दाखल करताना महायुती आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अनेक दिग्गज नेते उपस्थित होते.याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे, मंत्री छगन भुजबळ, मंत्री आशिष शेलार, मंत्री भरत गोगावले, ज्येष्ठ नेते व माजी मंत्री दिलीप वळसे पाटील, खासदार पार्थ पवार, मंत्री इंद्रनील नाईक, माजी खासदार समीर भुजबळ यांच्यासह पक्षाचे अनेक विद्यमान आमदार व पदाधिकारी उपस्थित होते. उपस्थित सर्वच नेत्यांनी राजेंद्र जैन यांना शुभेच्छा देत त्यांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले.

प्रफुल पटेल यांचे विश्वासू शिलेदार: राजेंद्र जैन हे राष्ट्रवादी काँग्रेसचे विदर्भातील एक निष्ठावान आणि अत्यंत मजबूत संघटक म्हणून संपूर्ण राज्यात ओळखले जातात. पक्षाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष खा. प्रफुल पटेल यांचे ते ‘उजवे हात’ मानले जातात. जैन यांनी आजवर पक्षात विविध जिल्ह्यांचे संपर्कप्रमुख आणि निरीक्षक म्हणून अत्यंत यशस्वीरीत्या जबाबदारी सांभाळली आहे.सहकार ते विधिमंडळ असा प्रदीर्घ अनुभव:राजेंद्र जैन यांना विधिमंडळाचा दांडगा अनुभव आहे. यापूर्वी २००४ ते २०१६ अशा सलग १२ वर्षांच्या प्रदीर्घ काळासाठी त्यांनी विधानपरिषदेवर आमदार (MLC) म्हणून धडाडीने प्रतिनिधित्व केले आहे. केवळ राजकारणातच नव्हे, तर सहकार क्षेत्रातही त्यांचा मोठा दबदबा राहिला आहे. त्यांनी गोंदिया जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्षपदही यशस्वीपणे भूषवले असून शेतकऱ्यांच्या प्रश्नांची त्यांना उत्तम जाण आहे.नुकत्याच पार पडलेल्या राज्यसभा आणि विधानपरिषद निवडणुकांमध्येही त्यांच्या नावाची पक्षाच्या कोअर कमिटीत प्रबळ दावेदार म्हणून चर्चा झाली होती. अखेर त्यांच्या प्रदीर्घ अनुभवाची आणि पक्षनिष्ठेची दखल घेत पक्षश्रेष्ठींनी त्यांच्यावर राज्यसभेची मोठी जबाबदारी सोपवली आहे. त्यांच्या या उमेदवारीमुळे गोंदिया जिल्ह्यासह संपूर्ण विदर्भात राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले आहे.

Spread the News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *