दुचाकी, बंदूक सोडून शिकाऱ्यांचा पळ; लाखांदूर वन पथकाची मोठी कारवाई!
सावरगाव येथील शेतशिवारात वन विभागाची धाड; भरमार बंदूक व दोन दुचाकी जप्त
अंधाराचा फायदा घेऊन दोन आरोपी फरार; वन्यजीव शिकार कट उधळला
लाखांदूर (भंडारा) : लाखांदूर वनक्षेत्रात वन्यजीव शिकारीचा कट वनविभागाच्या सतर्कतेमुळे उधळून लावण्यात आला आहे. गोपनीय माहितीच्या आधारे लाखांदूर वनविभागाच्या पथकाने धाड टाकून कारवाई केली. मात्र अंधाराचा फायदा घेऊन दोन आरोपी घटनास्थळावरून फरार झाले. कारवाईदरम्यान वनविभागाने देशी बनावटीची भरमार बंदूक, दुचाकीसह इतर शिकारी साहित्य जप्त केले आहे.
३१ ऑगस्ट रोजी रात्री अंदाजे ९:४० वाजताच्या सुमारास सावरगाव येथील गट क्रमांक ७९ मध्ये काही अज्ञात इसम वन्यप्राण्यांची अवैध शिकार करत असल्याची गोपनीय माहिती लाखांदूर वनविभागाला मिळाली होती. माहितीच्या आधारे वनपरिक्षेत्र अधिकारी प्रदीप चन्ने यांच्या नेतृत्वाखाली विशेष पथकाने तत्काळ सापळा रचून घटनास्थळावर धाड टाकली. वनाधिकाऱ्यांना पाहताच आरोपींनी अंधारातून पळ काढला.
घटनास्थळावरील तपासात व जप्त करण्यात आलेल्या पुराव्यांच्या आधारे अमीतसिंग कांचनसिंग रामगडे (रा. झिरोबा) आणि यूफूल पृथ्वीराज जांभूळकर (रा. वार्ड क्रमांक ०५, लाखांदूर) या दोन आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पंचनामा व जप्तीनामा करण्यात आला असून देशी बनावटीची भरमार बंदूक, हेड टॉर्च, १०० ग्राम बारूद, १३ छर्रे व ‘एमएच ३६ एटी ४८४१’ क्रमांकाची दुचाकी असा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. पसार झालेल्या दोन्ही आरोपींचा शोध वन विभागाचे पथक घेत आहे.
कारवाईत यांचा सहभाग
दोन्ही आरोपींविरुद्ध वन्यजीव (संरक्षण) अधिनियम, १९७२ मधील विविध कलमांन्वये वन्यजीव गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक वनसंरक्षक संजय मेंढे आणि वनपरिक्षेत्र अधिकारी प्रदीप चन्ने करत आहेत. ही कारवाई बीट रक्षक टी. एस. डावकोरे, सी. जी. जारवाल आणि इतर वनकर्मचाऱ्यांच्या पथकाने पार पाडली.

