LatestNewsगोंदिया- भंडारा

पाणीपुरवठा योजना सुरू न झाल्यास सरपंचांसह मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या कार्यालयावर धडकणार!

आमदार राजकुमार बडोले यांचा प्रशासनाला थेट इशारा; गुरुवारी योजना पूर्ववत न झाल्यास शुक्रवारी जि. प. मध्ये ठिय्या आंदोलन
अर्जुनी मोरगाव (गोंदिया):
तालुक्यातील रामपुरी, खांबी व सिरेगाव बांध प्रादेशिक पाणीपुरवठा योजना थकीत वीजबिलामुळे १ सप्टेंबरपासून बंद पडल्याने निर्माण झालेली भीषण पाणीटंचाई दूर करण्यासाठी परिसरातील सरपंचांच्या शिष्टमंडळाने मंगळवारी, १५ सप्टेंबर रोजी आमदार राजकुमार बडोले यांची भेट घेऊन निवेदन दिले. नागरिकांचे हाल लक्षात घेता, येत्या गुरुवारपर्यंत या योजना पूर्ववत सुरू न झाल्यास शुक्रवारी सर्व सरपंचांना सोबत घेऊन जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या (CEO) कार्यालयावर धडक देत ठिय्या आंदोलन छेडण्याचा इशारा आमदार राजकुमार बडोले यांनी दिला आहे.

रामपुरी, खांबी आणि सिरेगाव बांध या प्रादेशिक पाणीपुरवठा योजनांवर परिसरातील अनेक गावे व हजारो कुटुंबे अवलंबून आहेत. मात्र, वीजबिल थकीत राहिल्याने १ सप्टेंबरपासून या योजनांचा पुरवठा खंडित करण्यात आला आहे. यामुळे ऐन पावसाळ्यातही महिला, ज्येष्ठ नागरिक, विद्यार्थी व ग्रामस्थांना पाण्यासाठी पायपीट करावी लागत आहे. थकीत वीजबिलाचा प्रश्न तातडीने मार्गी लावून पाणीपुरवठा सुरळीत करण्याची आग्रही मागणी सरपंचांनी निवेदनाद्वारे केली. यावेळी योजनांचे थकीत वीजबिल व इतर देणी भागवण्यासाठी तात्काळ निधी उपलब्ध करून द्यावा, योजनांच्या देखभाल-दुरुस्तीसाठी कायमस्वरूपी आर्थिक व्यवस्था करावी आणि भविष्यात निधीअभावी योजना बंद पडू नयेत यासाठी शासनस्तरावर ठोस उपाययोजना आखण्यात याव्यात, अशी मागणीही करण्यात आली. 
या शिष्टमंडळात देवलगावच्या सरपंच सौ. दिपाली कापगते, सुकळीच्या सरपंच सौ. पंचशीला मेश्राम, भिवखिडकीचे उपसरपंच नीलकंठ बोरकर, चान्नाचे उपसरपंच मोरेश्वर सोनवणे, खांबीच्या सरपंच सौ. अश्विनी लोणारे, बोरटोलाच्या सरपंच सौ. कुरुंदा वैद्य, सिरेगावच्या सरपंच सौ. सागरबाई चिमणकर, सोमलपूरच्या सरपंच सौ. भूमिका ढोक, मुंगलीचे सरपंच भूषण नेवारे, अरततोंडीचे सरपंच प्रदीप कांबळे, माजी जि. प. सदस्य किशोर तरोणे, पं. स. सदस्य हेमराज पुस्तोडे यांच्यासह अनेक गावांचे सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य व सामाजिक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आमदार बडोले आक्रमक:
“नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न हा अत्यंत गंभीर व संवेदनशील आहे. कोणत्याही परिस्थितीत नागरिकांना पाण्यापासून वंचित ठेवता येणार नाही. प्रशासनाने तातडीने कार्यवाही करून योजना सुरू कराव्यात. जर गुरुवारपर्यंत पाणीपुरवठा सुरू झाला नाही, तर शुक्रवारी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या कक्षात ठिय्या आंदोलन केले जाईल,” असा स्पष्ट इशारा आमदार बडोले यांनी दिला.

Spread the News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *