नाली सफाईसाठी युवकाचे ग्रामपंचायत छतावर ‘शोले’ स्टाईल आंदोलन !
कीटकनाशकाची बाटली हाती घेतल्याने खळबळ
गोरेगाव तालुक्यातील कमरगाव येथील घटना
गोरेगाव (गोंदिया) : नाल्यांच्या सफाईच्या प्रलंबित मागणीवरून एका संतप्त युवकाने थेट ग्रामपंचायत इमारतीच्या छतावर चढून ‘शोले’ स्टाईल आंदोलन सुरू केल्याची खळबळजनक घटना गोरेगाव तालुक्यातील कमरगाव येथे घडली. मागण्या पूर्ण न झाल्यास हातातील कीटकनाशक प्राशन करून आत्महत्या करण्याची धमकी या युवकाने दिल्याने प्रशासन आणि पोलिसांची चांगलीच धांदल उडाली. दिनेश नागपुरे असे या आंदोलक युवकाचे नाव आहे.

कमरगाव येथे गेल्या अनेक दिवसांपासून नाल्यांची नियमित सफाई झाली नसल्याने ठिकठिकाणी सांडपाणी तुंबले आहे. घरांसमोर घाण पाणी साचल्याने परिसरात दुर्गंधी पसरली असून डासांचा प्रादुर्भाव कमालीचा वाढला आहे. यामुळे ग्रामस्थांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर बनला असून साथीचे आजार पसरण्याची भीती व्यक्त केली जात आहे. नाल्यांची तात्काळ सफाई करण्यात यावी, यासाठी दिनेश नागपुरे यांनी ग्रामपंचायत प्रशासनाकडे वारंवार पाठपुरावा करून निवेदने दिली होती. एवढेच नव्हे तर गोरेगाव पंचायत समिती आणि गोंदिया जिल्हाधिकाऱ्यांनाही निवेदने सोपवण्यात आली होती. मात्र, प्रशासनाकडून या गंभीर समस्येकडे सातत्याने दुर्लक्ष करण्यात आले. प्रशासनाच्या या उदासीन धोरणाला कंटाळून अखेर नागपुरे यांनी थेट ग्रामपंचायत इमारतीचे छत गाठले.
हातात कीटकनाशकाची बाटली अन् प्रशासनात धावपळ
छतावर चढलेल्या नागपुरे यांच्या हातात भाताच्या पिकावर फवारणी करण्याचे कीटकनाशक असल्याचे निदर्शनास आले. नाल्यांच्या सफाईबाबत तात्काळ ठोस निर्णय न घेतल्यास हे औषध प्राशन करून जीवन संपवू, असा इशारा त्यांनी दिल्याने परिसरात एकच खळबळ उडाली.
पोलिसांची घटनास्थळी धाव
घटनेची माहिती मिळताच पोलीस पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी घटनास्थळी जमावाला नियंत्रणात आणत नागपुरे यांची समजूत काढण्याचे आणि त्यांना सुरक्षितपणे खाली उतरवण्याचे प्रयत्न सुरू केले. दरम्यान, या नाट्यमय आंदोलनानंतर तरी ग्रामपंचायत प्रशासन जागे होऊन नाल्यांची सफाई करते का, याकडे संपूर्ण गावाचे लक्ष लागले आहे.

