LatestNewsगोंदियाविदर्भ

हिक्केरच्या घनदाट जंगलात जमिनीखाली पुरून ठेवलेला मोठा शस्त्रसाठा व स्फोटके जप्त

गडचिरोली पोलिसांची धडक कारवाई;
माओवाद्यांचा मोठा घातपाताचा कट उधळला : सी-६० आणि बीडीडीएस पथकाची संयुक्त मोहीम
गडचिरोली :
जिल्ह्यातून माओवादाचा प्रभाव सातत्याने कमी होत असतानाच, गडचिरोली पोलीस दलाने आणखी एक मोठी कारवाई करत माओवाद्यांचा घातपाताचा मोठा कट उधळून लावला आहे. गर्देवाडा पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या हिक्केर परिसरातील घनदाट व दुर्गम जंगलात माओवाद्यांनी जमिनीखाली लपवून ठेवलेला प्रचंड शस्त्रसाठा आणि स्फोटक साहित्य पोलिसांनी मंगळवारी (दि. १७ नोव्हेंबर) हस्तगत केले. या कारवाईमुळे सुरक्षा दलांवर मोठा हल्ला घडवून आणण्याचा माओवाद्यांचा मनसुबा धुळीस मिळाला आहे.
आंतरराज्यीय सीमावर्ती भागातील दुर्गम जंगलाचा फायदा घेत माओवाद्यांनी सुरक्षा दलांना लक्ष्य करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर शस्त्रे व स्फोटके जमिनीत पुरून ठेवल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली होती. निवडणुका किंवा आगामी नक्षल सप्ताहादरम्यान या घातक साहित्याचा वापर करून मोठा हिंसाचार घडवण्याचा त्यांचा कट होता.
सी-६० आणि बीडीडीएस पथकांची संयुक्त शोधमोहीम
या माहितीची गंभीर दखल घेत पोलीस अधीक्षक एम. रमेश यांच्या मार्गदर्शनाखाली १७ नोव्हेंबर रोजी विशेष अभियान पथकाच्या (C-60) आणि प्राणहिताच्या ५ तुकड्या तसेच बॉम्ब शोधक व नाशक पथकाची (BDDS) २ पथके तातडीने हिक्केर जंगल परिसरात शोधमोहिमेसाठी रवाना करण्यात आली.
जंगलातून जप्त केलेले घातक साहित्य
बीडीडीएस पथकाने मेटल डिटेक्टर आणि अत्याधुनिक उपकरणांच्या साहाय्याने परिसराची कसून तपासणी केली असता, जमिनीखाली लपवून ठेवलेला खालीलप्रमाणे शस्त्रसाठा हाती लागला —
अग्निशस्त्रे : १ नग १२ बोर रायफल आणि १ नग एअर गन रायफल.
जिवंत काडतुसे : १३ नग .३०३ जिवंत काडतुसे आणि १८ नग ८ एम.एम. जिवंत काडतुसे.
स्फोटके व लाँचर : ३ नग हँड ग्रेनेड, १८ नग बीजीएल (BGL) सेल आणि २ नग बीजीएल लाँचर.
इतर साहित्य : १० नग डेटोनेटर, २१ नग सुराका सेल, १ नग होंडा कंपनीचे इलेक्ट्रिक जनरेटर, २२ नग वायर बंडल आणि मोठ्या प्रमाणावर नक्षलवादी साहित्य.
पोलीस दलाच्या धडाडीचे कौतुक
ही यशस्वी मोहीम पोलीस अधीक्षक एम. रमेश यांच्या आदेशानुसार अपर पोलीस अधीक्षक (अभियान) कार्तिक मधीरा, अपर पोलीस अधीक्षक गोकुल राज जी., अपर पोलीस अधीक्षक अहेरी (प्राणहिता) हर्षवर्धन बि. जे. आणि पोलीस उपअधीक्षक (अभियान) सुनील उईके यांच्या थेट देखरेखीखाली पार पडली. विशेष अभियान पथक आणि बीडीडीएसच्या जवानांनी दाखविलेल्या प्रसंगावधानाबद्दल व साहसाबद्दल पोलीस अधीक्षक एम. रमेश यांनी संपूर्ण पथकाचे अभिनंदन करत त्यांचे विशेष कौतुक केले आहे.

Spread the News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *