LatestNewsगोंदिया- भंडाराविदर्भ

भर्रेगाव फाट्याजवळ ई-रिक्षाला भरधाव ट्रकची जोरदार धडक; चालकासह सात जण जखमी!

महामार्ग क्रमांक ५३ वर भीषण अपघात : पाच शाळकरी मुलींचा होता प्रवास; चौघांची प्रकृती गंभीर
देवरी (गोंदिया ) :
रायपूर-नागपूर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५३ वरील भर्रेगाव फाट्याजवळ बुधवारी (दि. १८ नोव्हेंबर) सकाळी १० वाजेच्या सुमारास भरधाव ट्रकने प्रवाशांनी भरलेल्या ई-रिक्षाला मागून जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात ई-रिक्षाचालकासह एकूण सात जण जखमी झाले आहेत. अपघातावेळी ई-रिक्षात चालकासह एक महिला आणि पाच शाळकरी मुली प्रवास करत होत्या. जखमींपैकी चौघांची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना प्राथमिक उपचारानंतर पुढील उपचारासाठी गोंदिया येथील शासकीय रुग्णालयात हलविण्यात आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ई-रिक्षा क्रमांक एमएच-३५ ए.एच. २२०३ मधून चालकासह सहा प्रवासी देवरीच्या दिशेने येत होते. भर्रेगाव फाट्याजवळ मागून भरधाव वेगाने आलेल्या ट्रक क्रमांक सीजी-०८ ए.झेड. २४५१ ने ई-रिक्षाला जोरदार धडक दिली. धडक इतकी भीषण होती की ई-रिक्षाचा चक्काचूर होऊन आतील सर्वच प्रवासी जखमी झाले. अपघातानंतर परिसरातील नागरिकांनी तातडीने धाव घेत सर्व जखमींना देवरी येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले.
अपघातातील जखमींची नावे
या अपघातात ई-रिक्षाचालक देवेंद्र संपत सरोटे (वय ४५, रा. शिरपूर) यांच्यासह प्रवासी अनन्या भाऊराव चुटे (वय १८), गुंजन भाऊराव चुटे (वय १७), हर्षिता राजेंद्र सरोटे (वय १७, तिघी रा. कुंभारटोला), भानुबाई निपूर मडावी (वय ४०, रा. भर्रेगाव), वेदिका संजय गाते (वय १३) आणि युक्तिका संजय गाते (वय ४, दोघी रा. शिरपूर) हे जखमी झाले आहेत. यापैकी अनन्या चुटे, वेदिका गाते, हर्षिता सरोटे या तीन शाळकरी मुलींसह भानुबाई मडावी यांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना गोंदिया येथे रेफर करण्यात आले आहे.
माजी आमदार सहसराम कोरोटे धावले मदतीला
अपघाताची माहिती मिळताच देवरी-आमगाव विधानसभा क्षेत्राचे माजी आमदार सहसराम कोरोटे यांनी क्षणाचाही विलंब न करता देवरी येथील ग्रामीण रुग्णालयात धाव घेतली. त्यांनी सर्व जखमींची आस्थेने विचारपूस करत डॉक्टरांकडून त्यांच्या प्रकृतीची माहिती जाणून घेतली. गंभीर जखमींना तातडीने योग्य व दर्जेदार वैद्यकीय उपचार मिळावेत, यासाठी त्यांनी रुग्णालय प्रशासनाला आवश्यक त्या सूचना दिल्या.
क्षमतेपेक्षा अधिक वाहतुकीचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर
दरम्यान, या अपघातामुळे ई-रिक्षांची प्रवासी क्षमता आणि महामार्गावरील सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. चालकासह तब्बल सात जण या ई-रिक्षातून प्रवास करत होते. विशेषतः शाळकरी मुलींची वाहतूक करताना क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी बसवणे जिवावर बेतू शकते, हे या घटनेतून स्पष्ट झाले आहे. राष्ट्रीय महामार्गावर नियमांचे उल्लंघन करून होणाऱ्या ई-रिक्षा वाहतुकीवर परिवहन विभागाने (RTO) आणि पोलिसांनी कठोर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांतून होत आहे.

Spread the News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *