लोखंडी ड्रम कापताना भीषण स्फोट; वेल्डिंग वर्कशॉपमधील ३६ वर्षीय कामगाराचा दुर्दैवी मृत्यू!
छोटा गोंदियातील शिवनगर येथील घटना
संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद
गोंदिया : गोंदिया शहरातील छोटा गोंदिया परिसरातील शिवनगर येथील एका वेल्डिंग वर्कशॉपमध्ये लोखंडी ड्रम कापण्याचे काम सुरू असताना अचानक भीषण स्फोट झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या स्फोटात वर्कशॉपमध्ये कार्यरत असलेल्या ३६ वर्षीय तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. योगेश राहंगडाले (वय ३६) असे मृत तरुणाचे नाव आहे. हा संपूर्ण थरारक प्रकार परिसरातील सीसीटीव्ही (CCTV) कॅमेऱ्यात कैद झाला असून, या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, छोटा गोंदियातील शिवनगर परिसरात असलेल्या एका वेल्डिंग वर्कशॉपमध्ये काम सुरू होते. यावेळी योगेश राहंगडाले हे इलेक्ट्रिक कटर मशीनच्या साहाय्याने एक बंद लोखंडी ड्रम कापण्याचे काम करत होते. ड्रम कापत असताना कटर मशीनमधून उडालेल्या ठिणग्या ड्रममध्ये शिल्लक असलेल्या ज्वलनशील गॅसच्या संपर्कात आल्या आणि क्षणात कानठळ्या बसवणारा भीषण स्फोट झाला.
उपचारापूर्वीच डॉक्टरांनी केले मृत घोषित
स्फोट इतका जोरदार होता की योगेश राहंगडाले हे गंभीर जखमी होऊन दूर फेकले गेले. स्फोटाचा आवाज ऐकताच परिसरातील नागरिक आणि सहकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या योगेश यांना तात्काळ उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले; मात्र, उपचारापूर्वीच डॉक्टरांनी तपासून त्यांना मृत घोषित केले.
दरम्यान, या काळजाचा थरकाप उडविणाऱ्या घटनेचे दृश्य सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले आहे. या दुर्घटनेमुळे वर्कशॉपमधील कामगारांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून, मृत योगेश राहंगडाले यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

