खेळता खेळता काळाचा घाला; नागपुरात ११ वर्षांच्या चिमुरड्याचा गळफास लागून दुर्दैवी मृत्यू!
नागपूर: “भांडू नका, दोघेही घरातच खेळा,” अशी मायेची सूचना देऊन आई बँकेतील आपल्या नोकरीवर गेली. मात्र, काही वेळातच तिच्या मोबाईलवर एक असा फोन आला, ज्याने तिच्या पायाखालची जमीनच सरकली. धावपळ करत ती घरी परतली, तेव्हा तिचा काळजाचा तुकडा निपचित पडला होता. तो गोड प्रसंग आठवून हंबरडा फोडणारी आई आता पूर्णपणे अबोल झाली आहे. प्रतापनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत खेळता खेळता ११ वर्षांच्या चिमुरड्याचा गळफास लागून मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. मल्हार रंगारी (वय ११) असे मृत बालकाचे नाव आहे. याप्रकरणी प्रतापनगर पोलिसांनी तुर्तास आकस्मिक मृत्यूची नोंद केली असून पुढील तपास सुरू केला आहे.
नेमकं काय घडलं? (खेळता खेळता लागला गळफास?)
रंगारी कुटुंब व्हीएनआयटी (VNIT) जवळील एका अपार्टमेंटमध्ये राहते. मल्हारचे वडील एका खाजगी कंपनीत कार्यरत असून आई बँकेत नोकरीला आहे. त्यांना एक मुलगा व एक मुलगी आहे. नेहमीप्रमाणे आई-बाबा कामावर गेल्यानंतर घरात दोन्ही बहीण-भाऊ आणि त्यांच्या सांभाळासाठी आजी होती.
दुपारच्या सुमारास दोन्ही बहीण-भाऊ एकत्र खेळत होते. त्यानंतर मल्हार दुसऱ्या खोलीत खेळण्यासाठी गेला. पोलिसांच्या प्राथमिक अंदाजानुसार, खोलीत खेळत असताना त्याने कुत्र्याचा पट्टा गळ्यात घातला व पट्ट्याचे दुसरे टोक खिडकीला बांधून तो खुर्चीवर उभा राहिला. यादरम्यान अचानक खुर्ची सरकली आणि त्याच्या गळ्याला फास लागला. तो मूनवॉक करत असावा किंवा कोणताही खेळ खेळत असावा, असा अंदाज वर्तवला जात आहे. काही वेळाने बहीण त्या खोलीत गेली असता मल्हारची हालचाल होत नव्हती. तिने आरडाओरड करताच आजी धावून आली. माहिती मिळताच आई-वडीलही घरी पोहोचले. त्याला तातडीने रुग्णालयात नेण्यात आले, मात्र डॉक्टरांनी तपासून त्याला मृत घोषित केले.
मूनवॉक आणि बॅडमिंटनमध्ये होता ‘मास्टर’
मल्हार अवघ्या ११ वर्षांचा असला तरी तो वयाच्या मानाने अत्यंत हुशार आणि पुढे होता. तो एक उत्कृष्ट बॅडमिंटनपटू होता. याशिवाय त्याला डान्सची प्रचंड आवड होती. प्रसिद्ध पॉप स्टार मायकल जॅक्सनप्रमाणे हुबेहूब ‘मूनवॉक’ करण्यात तो मास्टर होता. आता केवळ व्हिडिओच्या माध्यमातूनच त्याच्या या गोड आठवणी कुटुंबाकडे शिल्लक राहिल्या आहेत.
प्रतापनगर परिसरात सर्वत्र हळहळ
एकुलता एक मुलगा अचानक डोळ्यादेखत निघून गेल्याने रंगारी कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. आपल्या लाडक्या लेकाचा विरह सहन न झाल्याने आई रडून रडून बेशुद्ध पडली असून ती पूर्णपणे अबोल झाली आहे. या धक्कादायक आणि दुर्दैवी घटनेमुळे संपूर्ण प्रतापनगर परिसरात तीव्र हळहळ व्यक्त केली जात आहे.

