LatestNewsगुन्हेवार्तागोंदियाविदर्भ

पोलीस वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार तीन तरुणांचा जागीच मृत्यू

गोंदिया-तिरोडा महामार्गावर दांडेगावजवळ भीषण अपघात!
खडबंदा आणि सेजगाव परिसरात शोककळा
गोंदिया :
गोंदिया-तिरोडा राज्य महामार्गावरील दांडेगाव बसस्थानकाजवळ बुधवारी (दि. २५ नोव्हेंबर) रात्री ८:३० वाजेच्या सुमारास झालेल्या भीषण अपघातात दुचाकीस्वार तीन तरुणांचा घटनास्थळीच दुर्दैवी मृत्यू झाला. प्राथमिक माहितीनुसार, भरधाव पोलीस वाहनाने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिल्याने हा हृदयद्रावक अपघात घडला. या घटनेमुळे दांडेगाव, खडबंदा आणि सेजगाव परिसरात शोककळा पसरली असून, नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, खडबंदा येथील रहिवासी कामडे आणि बावनकर हे दोघे तरुण आपल्या गावातील धान कापणी करणाऱ्या हार्वेस्टर मशीनच्या दुरुस्तीच्या कामासाठी सेजगाव येथे गेले होते. काम आटोपल्यानंतर ते तेथून कार्तिक बिसेन या तरुणाला सोबत घेऊन तिघेही एकाच दुचाकीवरून परतीच्या प्रवासाला निघाले. रात्री सुमारे ८:३० वाजेच्या सुमारास त्यांची दुचाकी गोंदिया-तिरोडा मार्गावरील दांडेगाव बसस्थानकाजवळ पोहोचली असता, पोलीस वाहनाने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली.
धडक इतकी भीषण होती की तिघेही तरुण रस्त्यावर फेकले जाऊन गंभीर जखमी झाले आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला. अपघाताचा आवाज ऐकताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी मोठी गर्दी केली. तीन तरुणांचा एकाच वेळी अकाली मृत्यू झाल्याने त्यांच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
पीडित कुटुंबांना आर्थिक मदत आणि नोकरी देण्याची मागणी
या हृदयद्रावक अपघातानंतर स्थानिक ग्रामस्थांनी प्रशासनासमोर आपल्या मागण्या मांडल्या आहेत. मृत तरुणांच्या कुटुंबांची हलाखीची आर्थिक परिस्थिती लक्षात घेता शासनाने तात्काळ भरीव आर्थिक मदत जाहीर करावी. तसेच, भविष्यात या कुटुंबांवर उपासमारीची वेळ येऊ नये म्हणून प्रत्येक बाधित कुटुंबातील एका सदस्याला शासकीय सेवेत सामावून घ्यावे, अशी आग्रही मागणी ग्रामस्थांनी केली आहे. दरम्यान, या अपघातातील पोलीस वाहनाची नेमकी भूमिका आणि अपघाताच्या वास्तविक कारणांचा सखोल तपास सुरू करण्यात आला आहे.

Spread the News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *