गोंदिया डीबी पथकाची धडक कारवाई; अवघ्या १२ तासांत १.६० लाखांच्या तीन दुचाकी जप्त!
वाहनचोरीच्या तीन गुन्ह्यांचा उलगडा : दोघा अल्पवयीन मुलांना घेतले ताब्यात
गोंदिया : शहरात वाढलेल्या दुचाकी चोरीच्या घटनांना आळा घालण्यात गोंदिया शहर पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाला (DB Squad) मोठे यश आले आहे. गुन्हा दाखल झाल्यापासून अवघ्या १२ तासांच्या आत पोलिसांनी १ लाख ६० हजार रुपये किमतीच्या चोरीस गेलेल्या तीन दुचाकी जप्त करून वाहनचोरीच्या तीन गुन्ह्यांचा उलगडा केला आहे. याप्रकरणी दोघा अल्पवयीन मुलांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
सविस्तर वृत्त असे की, शंकर चौक, सिंधी कॉलनी, गोंदिया येथील रहिवासी हरेश केसवदास भागवानी (वय ४७) यांची ग्रे रंगाची होंडा ॲक्टिव्हा स्कुटी (क्र. एम.एच. ३५/ए.पी. ४८४६, अंदाजे किंमत ५० हजार रुपये) कुडवा लाईन येथून २० नोव्हेंबर रोजी दुपारी ३:४५ वाजेच्या सुमारास अज्ञात चोरट्याने लंपास केली होती. याप्रकरणी भागवानी यांनी २३ नोव्हेंबर रोजी दिलेल्या तक्रारीवरून गोंदिया शहर पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ३०३(२) अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला होता.
गस्तीदरम्यान संशयास्पद हालचालींवरून पकडले
या गुन्ह्याचा तपास सुरू असताना शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रवीण बोरकुटे यांच्या मार्गदर्शनाखाली डीबी पथकाचे अधिकारी व अंमलदार परिसरात गस्त घालत होते. दरम्यान, मरघट परिसराकडून एका ॲक्टिव्हा मोपेडवर दोन मुले येताना दिसली. पोलिसांना पाहताच त्यांच्या हालचाली संशयास्पद वाटल्याने पथकाने त्यांना थांबवून चौकशी केली. चौकशीत दोन्ही मुले अल्पवयीन असल्याचे समोर आले, तसेच त्यांच्या ताब्यातील ॲक्टिव्हा स्कुटी (एम.एच. ३५/ए.पी. ४८४६) ही कुडवा लाईन येथून चोरीस गेलेली असल्याचे निष्पन्न झाले.
सखोल चौकशीत आणखी दोन दुचाकी जप्त
पोलिसांनी दोन्ही अल्पवयीन मुलांची अधिक चौकशी केली असता, त्यांनी शहरातील इतर ठिकाणांहूनही दुचाकी चोरल्याची कबुली दिली. त्यांच्या ताब्यातून शहर पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्यांतील खालीलप्रमाणे एकूण १ लाख ६० हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला —
होंडा ॲक्टिव्हा स्कुटी (क्र. एम.एच. ३५/ए.पी. ४८४६) : किंमत अंदाजे ५०,००० रुपये (अप. क्र. १०१७/२०२६)
होंडा ॲक्टिव्हा मोपेड (क्र. एम.एच. ३५/ए.पी. ८६३४) : किंमत अंदाजे ६०,००० रुपये (अप. क्र. १०१८/२०२६)
हिरो ग्लॅमर दुचाकी (क्र. एम.एच. ३५/ए.डी. १३९०) : किंमत अंदाजे ५०,००० रुपये (अप. क्र. १०१९/२०२६)
वरिष्ठांच्या मार्गदर्शनात धडाकेबाज कामगिरी
सदर उल्लेखनीय कामगिरी पोलीस अधीक्षक गोरख भामरे, अपर पोलीस अधीक्षक अभय डोंगरे, उपविभागीय पोलीस अधिकारी दिनेशचंद्र शुक्ला यांच्या मार्गदर्शनाखाली शहर पोलीस निरीक्षक प्रवीण बोरकुटे यांच्या नेतृत्वात डीबी पथकाच्या मपोउपनि प्रियंका बैस, सफौ केवलपालसिंग भाटीया, सुदेश टेंभरे, निशिकांत लोंदासे, कमलेश शहारे, पोना गंगाधर गुट्टे, पोशि दिनेश बिसेन, सुभाष सोनवाने, मुकेश रावते, अशोक राहांगडाले, प्रमोद शेंडे, सोनु नागपुरे, राकेश बंजारे, अजय बोपचे आणि राकेश डोंगरवार यांनी केली आहे.

