टाकेझरी-बेवारटोला जंगलातून नक्षल्यांचा शस्त्रसाठा हस्तगत
सर्च अभियानदरम्यान गोंदिया पोलिसांचा कारवाई
गोंदिया : जिल्ह्यात नक्षल चळवळीचा नायनाट करण्यासाठी पोलिस प्रशासनाकडून कसोसीचे प्रयत्न केले जात आहे. यातंर्गत नक्षलग्रस्त क्षेत्रावर विशेष लक्ष देवून नक्षली मोहिमांवर ब्रेक लावण्यात पोलिसांना यश आले आहे. तर दुसरीकडे शासनाच्या नक्षली आत्मसमर्पण योजनेला प्रतिसाद देत गोंदिया जिल्ह्यात तब्बल १४ माओवाद्यांनी आत्मसमर्पण केले. या नक्षल्यांनी दिलेल्या माहितीवरून पोलिसांनी जंगलात सर्च अभियान राबविले. यादरम्यान नक्षल्यांची भुमिगत करून लपविलेला प्रचंड शस्त्रसाठा पोलिसांच्या हाती लागला आहे. यामुळे नक्षल्यांची पाळेमुळे खोदून काढण्यात पोलिसांना यश मिळणार आहे. यातून नक्षल चळवळीला मोठा धक्का बसल्याचेही बोलले जात आहे.माओवाद्यांच्या एमएमसी झोनचा प्रवक्ता व एसझेडसीएम पदावर असलेला अनंत ऊर्फ विकास नवज्योत नागपुरे याने २८ नोव्हेंबर २०२५ रोजी त्याच्या १० साथीदारांसह, तसेच दरेकसा एरिया कमेटीचा कमांडर रोशन वेडजा याने १३ डिसेंबर २०२५ रोजी २ साथीदारांसह आत्मसमर्पण केले होते. जीआरबी डिव्हिजन अंतर्गत दरेकसा एरिया कमिटीतील तब्बल १४ माओवाद्यांनी गोंदिया जिल्हा पोलिस दलासमोर शरणागती पत्करली होती. आत्मसमर्पित माओवाद्यांच्या चौकशीतून मिळालेल्या खात्रीशीर माहितीच्या आधारे २५ जानेवारी २०२६ रोजी गोंदिया पोलिस दलाने मुरकूटडोह बेस कॅम्प अंतर्गत टाकेझरी-बेवारटोला डॅम परिसरातील जंगलात विशेष शोध मोहीम राबवली. या कारवाईदरम्यान माओवाद्यांनी भूमिगत करून ठेवलेला शस्त्रसाठा व स्फोटकांचा मोठा डम्प यशस्वीरित्या हस्तगत करण्यात आला. दरम्यान, गोंदिया जिल्ह्यात आत्मसमर्पित माओवाद्यांची सखोल चौकशी सुरू असून त्यांच्या माहितीच्या आधारे विविध जंगल परिसरात सतत शोध मोहिमा राबविण्यात येत आहेत. आगामी काळात आणखी मोठ्या कारवाया उघडकीस येण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. या शस्त्रसाठ्याच्या हस्तगततेमुळे मोठ्या घातपाती कारवायांना वेळेत आळा बसला असून, जिल्ह्यातील नक्षल नेटवर्कला जबर धक्का बसला आहे. ही कारवाई वरिष्ठ अधिकार्यांच्या सुचनेवरून गडचिरोली परिक्षेत्राचे पोलिस उपमहानिरीक्षक अंकित गोयल, गोंदियाचे पोलिस अधीक्षक गोरख भामरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरिक्षक प्रमोद भातनाते, सहायक पोलिस निरिक्षक संजय नाईक, पोलिस उपनिरिक्षक श्रीकांत हत्तीमारे, पोलिस हवालदार लक्ष्मण घरत, मुस्ताक सैय्यद, पोलिस शिपाई रमेश उईके, राजेश तावाडे, नक्षल सेल गोंदिया तसेच सी-६० झोडे पथकाने यशस्वी धडक कारवाई केली.
………..
जप्त करण्यात आलेला शस्त्रसाठामाओवाद्याच्या डम्पमधून एक एके-४७ रायफल, दोन एसएलआर रायफल, एक कोल्ट ऑटोमोटिव्ह पिस्टल, एक १२ बोअर रायफल, एक क्लेमोर माईन, तीन एक एके-४७ मॅग्झीन, नऊ एसएलआर मॅग्झीन, एक इंसास मॅग्झीन, एसएलआर राऊंड १८७, एके ४७ राऊंड ५८, इंसास राऊंड १५, रायफल राऊंड ३५ नग, ८ एमएम राऊंड १२, कोल्ट ऑटोमोटिव्ह पिस्टल ४५ राऊंड १४ नग, बीजीएल ४, सुरका शेल्स १०, सुरका लाँचर राऊंड १०, स्फोटक पदार्थ अंदाजे ८.५ किलो, डेटोनेटर, कॉर्डेक्स वायर, वॉकीटॉकी, सोलर प्लेट, बॅटर्या, कलर प्रिंटर व इतर महत्त्वाचे साहित्य जप्त करण्यात आले आहे.

