LatestNewsगोंदियाविदर्भ

हरदोली शिवारात कोंबड्यांची वाहतूक करणारे चारचाकी वाहन पलटी; सुदैवाने जीवितहानी टळली!

चालकाचे नियंत्रण सुटल्याने भररस्त्यावर झाला अपघात : वाहनाचे मोठे नुकसान; सालेकसा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील घटना
देवरी (गोंदिया ) :
आमगावकडून देवरीच्या दिशेने ब्रॉयलर कोंबड्यांची वाहतूक करणारे चारचाकी मालवाहू वाहन चालकाचे नियंत्रण सुटल्याने हरदोली शिवारात भररस्त्यावर पलटी झाल्याची घटना आज, बुधवार (दि. १८ नोव्हेंबर) रोजी सकाळी ८:३० वाजेच्या सुमारास घडली. या अपघातात वाहनाचे मोठे नुकसान झाले असून, सुदैवाने कोणतीही जीवितहानी न झाल्याने मोठा अनर्थ टळला.
मिळालेल्या माहितीनुसार, एमएच-४० ए.के. ७४०८ क्रमांकाचे चारचाकी वाहन ब्रॉयलर कोंबड्या घेऊन आमगाव येथून देवरीकडे जात होते. दरम्यान, सालेकसा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील हरदोली शिवार परिसरात आले असता चालकाचे वाहनावरील नियंत्रण अचानक सुटले आणि वाहन रस्त्यावरच कलंडले. अपघातामुळे वाहनातील कोंबड्यांची वाहतूक विस्कळीत झाली, तसेच वाहनाचीही मोठ्या प्रमाणावर मोडतोड झाली.
घटनेनंतर ग्रामस्थांची धाव; रस्ता सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर
भररस्त्यावर वाहन पलटी झाल्याचा आवाज होताच परिसरातील नागरिकांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत मदतकार्य केले. या घटनेमुळे काही काळ परिसरात बघ्यांची गर्दी जमली होती. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी किंवा गंभीर दुखापत झालेली नाही.
या घटनेमुळे भरधाव वेग, वाहनांवरील नियंत्रण आणि महामार्गावरील रस्ता सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. अशा अपघातांची पुनरावृत्ती टाळण्यासाठी वाहनचालकांनी वेगावर मर्यादा ठेवून काळजीपूर्वक वाहन चालवावे, अशी अपेक्षा नागरिकांमधून व्यक्त होत आहे. अपघाताचे नेमके कारण पोलिसांच्या तपासानंतरच स्पष्ट होणार आहे.

Spread the News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *