विवाहितेचा संशयास्पद मृत्यू; हत्येचा संशय, चिखली येथील घटना, पती पोलिसांच्या ताब्यात
गोंदिया: डुग्गीपार पोलीस ठाण्याच्या हद्दीतील चिखली गावात एका विवाहितेचा रक्ताच्या थारोळ्यात पडलेला मृतदेह आढळून आल्याने गावात खळबळ उडाली आहे. महिलेच्या डोक्यावर गंभीर जखमेच्या खुणा आढळल्या असून, हाताच्या बोटांवरही जखमा आहेत. प्राथमिकदृष्ट्या हा हत्येचा प्रकार असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. याप्रकरणी पोलिसांनी मृत महिलेच्या पतीला ताब्यात घेतले आहे. पती-पत्नीमध्ये रात्री झालेल्या वादानंतर ही घटना घडल्याचे सांगितले जात आहे. श्यामकला जागेश्वर शिवणकर (वय ४०, रा. चिखली) असे मृत विवाहितेचे नाव असून, ताब्यात घेण्यात आलेल्या पतीचे नाव जागेश्वर आसाराम शिवणकर (वय ४५) असे आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, जागेश्वर याला दारूचे व्यसन आहे. बुधवारी रात्री उशिरापर्यंत पती-पत्नीमध्ये घरात काही कारणावरून वाद झाला होता. गुरुवारी सकाळी श्यामकला अंथरुणावर बेशुद्ध अवस्थेत पडलेली दिसून आली. कुटुंबीयांनी जवळ जाऊन पाहिले असता तिच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली होती आणि हाताच्या बोटांवरही जखमा होत्या. बोटांवरील जखमांमुळे महिलेने स्वतःचा बचाव करण्याचा प्रयत्न केला असावा, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. घटनेनंतर पती घरातून पसार झाल्याची माहिती समोर आल्याने गावात हत्या की आत्महत्या, याबाबत विविध चर्चांना उधाण आले.
पोलिसांकडून सर्व बाजूंनी तपास सुरू:
घटनेची माहिती मिळताच डुग्गीपार पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत पंचनामा करून तपास सुरू केला. पोलिसांनी शोधमोहीम राबवत संशयित पती जागेश्वर शिवणकर याला ताब्यात घेतले आहे. महिलेचा मृत्यू नेमक्या कोणत्या परिस्थितीत झाला, तिच्यावर कोणत्या शस्त्राने वार करण्यात आले आणि या घटनेमागील नेमके कारण काय, या सर्व पैलूंचा सखोल तपास पोलिसांकडून केला जात आहे.

