घरफोडी करणाऱ्या दोन सराईत गुन्हेगारांना १२ तासांत बेड्या; सोन्याचा ऐवज हस्तगत!
गोंदिया शहर पोलिसांच्या डीबी पथकाची धडक कामगिरी
गोंदिया : परिवार बाहेरगावी गेल्याची संधी साधून बंद घराचे कुलूप तोडून घरफोडी करणाऱ्या दोन रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगारांना अवघ्या १२ तासांच्या आत अटक करण्यात गोंदिया शहर पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाला (DB Squad) मोठे यश आले आहे. पोलिसांनी आरोपींकडून चोरीला गेलेला सोन्याचा ऐवज हस्तगत केला असून, न्यायालयाने दोन्ही आरोपींना २१ नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
सविस्तर वृत्त असे की, सावित्रीबाई फुले वॉर्ड, कुंभारेनगर (लाल पहाडीजवळ), गोंदिया येथील रहिवासी जितेंद्र हरीचंद बागडकर (वय ३८) हे १० नोव्हेंबर रोजी परिवारासह बाहेरगावी गेले होते. १७ नोव्हेंबर रोजी सकाळी ११ वाजताच्या सुमारास ते घरी परतले असता, बेडरूममधील लोखंडी कपाटाचे कुलूप तुटलेले दिसले. कपाटाच्या कप्प्यात ठेवलेले १२ हजार रुपये किमतीचे एक जोड सोन्याचे झाले आणि १० हजार रुपये रोख असा एकूण २२ हजार रुपयांचा मुद्देमाल अज्ञात चोरट्याने लंपास केल्याचे त्यांच्या निदर्शनास आले.
याप्रकरणी जितेंद्र बागडकर यांच्या तक्रारीवरून १७ नोव्हेंबर रोजी गोंदिया शहर पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपीविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ३०५, ३३१(३), ३३१(४) अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला.
गोपनीय खबऱ्याच्या माहितीवरून सापळा; सोन्याचे झाले जप्त
गुन्हा दाखल होताच शहर पोलीस ठाण्याचे प्रभारी पोलीस निरीक्षक तिरुपती राणे यांच्या मार्गदर्शनाखाली डीबी पथकातील अधिकारी व अंमलदार परिसरात गस्त घालत होते. दरम्यान, गोपनीय खबऱ्याकडून पक्की माहिती मिळाली की, ही घरफोडी पोलीस अभिलेखावरील गुन्हेगार यश धर्मेंद्र वासनिक (वय १९, रा. लुंबिनी चौक, कुंभारेनगर, गोंदिया) आणि उदय ऊर्फ आऊ उमेश उपाध्याय (वय २२, रा. नाना चौक, कुंभारेनगर, गोंदिया) यांनी केली आहे.
पथकाने तात्काळ सापळा रचून या दोन्ही आरोपींना ताब्यात घेतले आणि कसून चौकशी केली असता त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली. पोलिसांनी त्यांच्याकडून चोरीला गेलेला १२ हजार रुपये किमतीचा एक जोड सोन्याचा झाला जप्त केला असून, चोरीच्या रोख रकमेचा शोध सुरू आहे. दोन्ही आरोपींना गोंदिया न्यायालयात हजर केले असता त्यांना २१ नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी रिमांड मंजूर करण्यात आला आहे.
वरिष्ठांच्या मार्गदर्शनात कारवाई
सदर उल्लेखनीय कामगिरी पोलीस अधीक्षक गोरख भामरे, अपर पोलीस अधीक्षक अभय डोंगरे, उपविभागीय पोलीस अधिकारी दिनेशचंद्र शुक्ला यांच्या मार्गदर्शनाखाली गोंदिया शहर पोलीस ठाण्याचे प्रभारी पोलीस निरीक्षक तिरुपती राणे, डीबी पथकाच्या मपोउपनि प्रियंका बैस, सफौ केवलपालसिंग भाटीया, पोहवा सुदेश टेंभरे, निशीकांत लोंदासे, पोना गंगाधर गुट्टे, पोशि दिनेश बिसेन, सुभाष सोनवाने, अशोक रहांगडाले, मुकेश रावते, प्रमोद शेंडे, सोनु नागपुरे, राकेश बंजारे, अजय बोपचे आणि राकेश डोंगरवार यांनी केली. पुढील तपास सफौ केवलपालसिंग भाटीया करत आहेत.

