जीडीसीसी बँक नोकर भरती प्रकरण चव्हाट्यावर; आरक्षणाच्या घोळावरून जिल्हा उपनिबंधकांचे चौकशीचे आदेश!
७७ पदांच्या भरती प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह : मागासवर्गीय व समांतर आरक्षण डावलल्याचा
गोंदिया : जिल्ह्याच्या सहकार व राजकीय क्षेत्रात अत्यंत महत्त्वाचे स्थान असलेल्या दि गोंदिया डिस्ट्रिक्ट सेंट्रल को-ऑपरेटिव्ह (जीडीसीसी) बँकेतील बहुचर्चित नोकर भरती प्रकरण आता चांगलेच चव्हाट्यावर आले आहे. या भरती प्रक्रियेत आरक्षणाच्या नियमांना बगल दिल्याच्या आणि प्रक्रियेत अनियमितता झाल्याच्या तक्रारीनंतर, जिल्हा उपनिबंधक कार्यालयाने या संपूर्ण प्रकरणाच्या सखोल चौकशीचे आदेश दिले आहेत. या आदेशामुळे सहकार वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.
दि गोंदिया डिस्ट्रिक्ट सेंट्रल को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेडमार्फत सरळ सेवा भरतीसाठी २२ जानेवारी २०२५ रोजी ऑनलाइन जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती. या जाहिरातीद्वारे द्वितीय श्रेणी अधिकारी पदाच्या ५, ज्युनिअर लिपिक पदाच्या ४७ आणि शिपाई पदाच्या २५ अशा एकूण ७७ रिक्त पदांची भरती प्रक्रिया राबविण्यात आली.
आरक्षण डावलल्याचा आणि नियमबाह्य एजन्सी नेमल्याचा आरोप
या भरती जाहिरातीमध्ये अनुसूचित जाती (SC), अनुसूचित जमाती (ST), इतर मागासवर्गीय (OBC), विमुक्त जाती व भटक्या जमाती (VJNT), विशेष मागास प्रवर्ग (SBC) तसेच दिव्यांग आणि अनाथ प्रवर्गासाठी आवश्यक असलेले घटनात्मक व समांतर आरक्षण ठेवण्यात आले नसल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे.
याशिवाय, राज्य शासनाने निश्चित केलेल्या अधिकृत एजन्सीऐवजी अन्य खाजगी कंपनीमार्फत ही भरती प्रक्रिया राबविण्यात आल्याचेही तक्रारीत नमूद केले आहे. मागासवर्गीय व वंचित घटकांना त्यांच्या घटनात्मक हक्कापासून वंचित ठेवून राबविलेली ही पदभरती तात्काळ रद्द करावी आणि दोषींवर कारवाई करावी, अशी लेखी तक्रार रोशन बडोले यांनी जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, गोंदिया यांच्याकडे दाखल केली होती.
तात्काळ स्वयंस्पष्ट अहवाल सादर करण्याचे आदेश
रोशन बडोले यांच्या तक्रारीची जिल्हा उपनिबंधक कार्यालयाने गंभीर दखल घेतली आहे. त्यानुसार जिल्हा उपनिबंधक कार्यालयाने २ नोव्हेंबर २०२६ रोजी सहायक निबंधक, सहकारी संस्था, गोंदिया यांना अधिकृत पत्र पाठविले आहे. या पत्राद्वारे तक्रार अर्जातील सर्व मुद्द्यांची सखोल चौकशी करून तातडीने स्वयंस्पष्ट अभिप्राय अहवाल सादर करण्याचे सक्त निर्देश देण्यात आले आहेत.
प्रशासनाच्या या भूमिकेमुळे आता जीडीसीसी बँकेतील या ७७ पदांच्या भरती प्रक्रियेचे भवितव्य टांगणीला लागले असून, चौकशी अहवालातून कोणते सत्य समोर येते, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

