LatestNewsगोंदियाविदर्भ

गोंदियाचा कायापालट! आमदार विनोद अग्रवाल यांच्या पाठपुराव्याला यश; तब्बल १,००० कोटींच्या विकासकामांना मंजुरी!

नागपूर पॅटर्नवर गोंदियात उभारला जाणार भव्य ‘एलिव्हेटेड सर्कल फ्लायओव्हर’
रावणवाडी–कामठा–आमगाव महामार्ग आणि २७ वर्षांपासून प्रलंबित जिल्हा कारागृहाचा प्रश्न सुटला
फुलचूर आयटीआयला अत्याधुनिक नवीन इमारतीचा ‘हिरवा कंदील’
गोंदिया (विशेष प्रतिनिधी):
गोंदिया शहर सर्वसुविधायुक्त, आधुनिक आणि विकसित करण्याच्या उद्देशाने आमदार विनोद अग्रवाल यांनी केलेल्या सातत्यपूर्ण प्रयत्नांना अखेर मोठे यश आले आहे. शासनाने आमदार अग्रवाल यांच्या विविध मागण्यांना सकारात्मक प्रतिसाद देत तब्बल १,००० कोटी रुपयांहून अधिकच्या अभूतपूर्व विकासकामांना मंजुरी दिली आहे. यामुळे गोंदिया जिल्ह्याला विकासाची एक मोठी ऐतिहासिक भेट मिळाली असून विधानसभा निवडणुकीपूर्वी जिल्ह्याचा चेहरामोहरा बदलणार आहे.
शहरातील वाढती वाहतूक कोंडी आणि अपघातांचे सत्र रोखण्यासाठी आमदार विनोद अग्रवाल यांनी केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे उड्डाणपुलाची मागणी केली होती. या मागणीची दखल घेत केंद्रीय मंत्र्यांनी बालाघाट टी-पॉइंट ते कुडवा येथील साईबाबा राईस मिलपर्यंतच्या सुमारे ३ किलोमीटर लांबीच्या (अंदाजित खर्च ४५० कोटी रुपये) फ्लायओव्हर प्रकल्पास मंजुरी दिली आहे. सध्या या प्रकल्पाचा सविस्तर प्रकल्प अहवाल (DPR) तयार करण्याचे काम वेगात सुरू आहे.
कसा असेल हा ‘एलिव्हेटेड सर्कल फ्लायओव्हर’? आमदार विनोद अग्रवाल यांनी सांगितले की, हा उड्डाणपूल नागपूरच्या एलिव्हेटेड रोटरी ब्रिजच्या धर्तीवर असणार आहे. हा एलिव्हेटेड सर्कल फ्लायओव्हर शहरातील प्रमुख चौक आणि रस्त्यांना उंच स्तरावर जोडेल. प्रस्तावित आराखड्यानुसार बालाघाट टी-पॉइंट येथे गोलाकार रचना केली जाईल, जिथून कुडवा मार्ग, जिल्हाधिकारी कार्यालय मार्ग, नागरा रोड, हड्डीटोली पूल तसेच मरारटोली पूल मार्ग हे एकमेकांशी थेट जोडले जातील. या प्रकल्पामुळे दासगाव मार्गावरील वाहतुकीसाठी पर्यायी बायपास जोडणी उपलब्ध होणार आहे.
रावणवाडी–कामठा–आमगाव महामार्गासाठी २९० कोटी!
गेल्या चार वर्षांपासून रावणवाडी–कामठा–आमगाव मार्गाचा राष्ट्रीय महामार्गाच्या धर्तीवर विकास करण्याची मागणी सुरू होती. शासनाने या २९ किलोमीटर लांबीच्या महामार्ग प्रकल्पासाठी २९० कोटी रुपयांची मंजुरी दिली आहे. या प्रकल्पामुळे परिसरातील दळणवळणाला मोठी गती मिळणार आहे.
२७ वर्षांनंतर जिल्हा कारागृहाचा वनवास संपला!
गेल्या २७ वर्षांपासून प्रलंबित असलेल्या गोंदिया जिल्हा कारागृहाच्या बांधकामाला अखेर प्रशासकीय मंजुरी मिळाली आहे. आमदार अग्रवाल यांच्या अभूतपूर्व पाठपुराव्यामुळे सरकारने या प्रकल्पासाठी २१८ कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. हे प्रस्तावित जिल्हा कारागृह कारंजा येथील पोलीस मुख्यालयाजवळ उभारण्यात येणार आहे.
तांत्रिक शिक्षणाला गती: आयटीआयसाठी ११६ कोटी!
फुलचूर येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचा (ITI) कायापालट करून ती अधिक आधुनिक व सुसज्ज करण्यासाठी नवीन इमारतीला मंजुरी देण्यात आली आहे. या अत्याधुनिक नवीन इमारतीसाठी ११६ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली असून, यामुळे जिल्ह्यातील तांत्रिक शिक्षण आणि तरुणांच्या कौशल्य विकासाला नवी दिशा मिळणार आहे.
नेत्यांचे मानले आभार: “केंद्र व राज्य सरकारच्या खंबीर सहकार्यामुळे गोंदिया विधानसभा मतदारसंघात विकासकामांना अभूतपूर्व वेग आला आहे,” असा विश्वास आमदार विनोद अग्रवाल यांनी व्यक्त केला. या महत्त्वपूर्ण विकास प्रकल्पांना मंजुरी दिल्याबद्दल त्यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले तसेच कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांचे जाहीर आभार मानले आहेत.

Spread the News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *