आमदार विजय रहांगडाले यांच्या मध्यस्थीने मृत कामगाराच्या कुटुंबीयांना १५ लाखांची मदत; पत्नीला १६ हजार रुपये वेतनाची नोकरी!
अदानी पॉवर प्रकल्पातील दुर्घटना
१४ लाखांचा धनादेश व १ लाखांची रोख रक्कम सुपूर्द
तिरोडा (गोंदिया) : अदानी पॉवर लिमिटेड, तिरोडा अंतर्गत कार्यरत असलेल्या ‘पॉवरमॅक कंपनी लिमिटेड’मध्ये रविवारी (दि. १५ नोव्हेंबर) कर्तव्यावर असताना झालेल्या दुर्घटनेत सुकडी येथील अमर मेश्राम (वय ३१) या तरुण कामगाराचा दुर्दैवी मृत्यू झाला. घरातील एकमेव कर्त्या पुरुषाचे अकाली निधन झाल्याने मेश्राम कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून, त्यांच्यासमोर उदरनिर्वाहाचा गंभीर प्रश्न उभा ठाकला होता. या घटनेची माहिती मिळताच तिरोडा-गोरेगाव विधानसभा क्षेत्राचे आमदार विजय रहांगडाले यांनी तात्काळ पुढाकार घेत कंपनी प्रशासन व पीडित कुटुंबीयांमध्ये यशस्वी मध्यस्थी केली. त्यांच्या प्रयत्नांमुळे मृत कामगाराच्या कुटुंबीयांना एकूण १५ लाख रुपयांची आर्थिक मदत व पत्नीला कायमस्वरूपी नोकरी मिळवून देण्यात यश आले आहे.
सदर दुर्घटनेनंतर कुटुंबाला न्याय्य आर्थिक मदत मिळावी आणि त्यांचे भविष्य सुरक्षित व्हावे, यासाठी आमदार विजय रहांगडाले यांनी तातडीने पॉवरमॅक कंपनी प्रशासनासोबत बैठक घेतली. आमदार रहांगडाले यांच्या आग्रही भूमिकेनंतर आणि यशस्वी चर्चेनंतर कंपनी प्रशासनाने मृत अमर मेश्राम यांच्या कुटुंबीयांना एकूण १५ लाख रुपयांची मदत देण्याचे मान्य केले. त्यानुसार १४ लाख रुपयांचा धनादेश (चेक) आणि तातडीच्या खर्चासाठी १ लाख रुपये रोख स्वरूपात कुटुंबीयांच्या सुपूर्द करण्यात आले.
पत्नीला दरमहा १६ हजार रुपये वेतनाची नोकरी
केवळ एकरकमी आर्थिक मदतीवर न थांबता कुटुंबाच्या पुढील उदरनिर्वाहाची कायमस्वरूपी सोय व्हावी, यासाठी आमदार रहांगडाले यांनी केलेल्या मागणीनुसार मृत अमर मेश्राम यांच्या पत्नीला पॉवरमॅक कंपनी लिमिटेडमध्ये प्रतिमहा १६ हजार रुपये वेतनाची नोकरी देण्याचा महत्त्वाचा निर्णयही कंपनीने घेतला आहे. यामुळे मेश्राम कुटुंबाला संकटाच्या काळात मोठ्या आर्थिक आधारासोबतच नियमित उत्पन्नाचे हक्काचे साधन उपलब्ध झाले आहे.
या प्रसंगी भंडारा-गोंदिया लोकसभा क्षेत्राचे खासदार डॉ. प्रशांत पडोळे, जिल्हा परिषद सदस्य जगदीश बावनथडे, पंचायत समिती सदस्य विजय बिंझाडे, कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक अनिल भगत, ओम पटले, विक्की जगणे, खुमेंद्र रहांगडाले, सरपंच राजू ठाकरे यांच्यासह अदानी समूहाचे स्टेशन हेड, पॉवरमॅक कंपनीचे अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
“प्रकल्पात काम करणाऱ्या कामगारांच्या सुरक्षिततेसोबतच त्यांच्या कुटुंबीयांच्या भविष्याची जबाबदारी घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे. कामावर असताना कामगाराचा दुर्दैवी मृत्यू झाल्यास संकटाच्या काळात पीडित कुटुंबाला खंबीर आर्थिक व सामाजिक आधार मिळवून देणे ही आपली सामाजिक बांधिलकी आहे.”
विजय रहांगडाले, आमदार, तिरोडा-गोरेगाव विधानसभा क्षेत्र

